15 December 2019

News Flash

दिवाळीसाठी माहेरी आलेल्या विवाहितेचा एकतर्फी प्रेमातून खून

एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू तरुणाने हा खून केल्याची बाब शुक्रवारी सकाळी समोर आली आहे.

सोलापूर : दिवाऴीनिमित्त सोलापुरात माहेरी आलेल्या विवाहितेचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार दमाणीनगराजवळ घडला. एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू तरुणाने हा खून केल्याची बाब शुक्रवारी सकाळी समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रियांका तुकाराम गोडगे (वय २२, रा. साकत, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचे वडील गोविंद कृष्णा चवरे (वय ४८, रा. न्यू लक्ष्मी मिल चाळ, रिलायन्स मॉलजवळ, देगाव रोड, सोलापूर) यांनी या संदर्भात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार राजू श्रीकांत शके  (रा. न्यू लक्ष्मी मिल चाळ) या तरुणाने सौ. प्रियांका हिचा एकतर्फी प्रेमातून गळा दाबून खून केल्याचे म्हटले आहे. गोविंद चवरे हे सोलापुरातील अश्विनी सहकारी रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी आहेत. त्यांची थोरली मुलगी प्रियांका ऊर्फ गौरी हिचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला होता. दिवाळी सणाकरिता ती आपली मुलगी श्रेया हिच्यासह पंधरा दिवसांपूर्वी माहेरी आली होती. श्रेया हिला खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने तिला वैद्यकीय उपचारासाठी प्रियांका ही घराजवळच असलेल्या एका खासगी दवाखान्यात तीन दिवसांपासून नेत होती. घराच्या परिसरात राहणाऱ्या राजू श्रीराम शके  हा प्रियांका हिचा विवाह होण्यापूर्वी तिला महाविद्यालयात जाता-येता रस्त्यावर अडवून भेटण्याचा प्रयत्न करीत असे. तो तिची छेडछाड करायचा. ही बाब निदर्शनास आल्यानंतर तिचे वडील गोविंद चवरे यांनी राजू शके याची कडक शब्दांत कानउघाडणी केली होती. त्याच्या घरातील मंडळींकडेही तक्रार केली होती.

दरम्यान, प्रियांका हिचा विवाह झाला आणि ती सासरी गेली. ती माहेरी जेव्हा यायची, तेव्हा राजू शके  हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा आणि पुन: पुन्हा तिची छेडछाड करायचा. काल गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास प्रियांका ही आजारी मुलगी श्रेया हिला वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात जाण्याकरिता घराबाहेर पडली. त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास प्रियांका हिच्या भावाचा मित्र शाम निकम हा छोटय़ा श्रेया हिला एकटीला घेऊन चवरे यांच्या घरी आला. तिच्या अंगावरील कपडे चिखलाने माखले होते. त्याने दिलेली माहिती धक्कादायक होती. राजू शके याने शाम निकम यास रेल्वे लाइन्स भागातील यश नगरात बोलावून घेतले होते. तेथे प्रियांका ही जमिनीवर चिखलात निपचित पडली होती. राजू याने कु. श्रेया हिला शाम याच्या ताब्यात देऊन तिला तिच्या घरी पोहोचविण्यास सांगितले. शाम याने त्याला ‘हे तू काय केलेस?’ असे विचारले असता त्याने, मी आता नवी वेस पोलीस चौकीत जात असल्याचे सांगितले. हा प्रकार समजताच चवरे कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रियांका हिला तातडीने छत्रपती शिवाजी महाराज सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. राजू शके याने एकतर्फी प्रेमातून तिचा गळा दाबून तिचा खून केल्याचे उघडकीस आले.

First Published on November 2, 2019 1:02 am

Web Title: married woman killed due to one sided love zws 70
Just Now!
X