सासरच्या छळाला कंटाळून तामसवाडी (ता. नेवासे) येथील पुष्पा अशोक पवार (वय २९) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी नेवासे पोलीस ठाण्यात पती व सासूविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

पुष्पा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी पती अशोक अर्जुन पवार व सासू सुभद्रा अर्जुन पवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. मयत पुष्पा हिचा भाऊ सोमनाथ लक्ष्मण आरसुळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, पुष्पा हिचे लग्न १५ वर्षांपूर्वी अशोक पवार यांचे बरोबर झालेले होते. तिला दोन मुले आहेत. अशोक पवार हा दारू पिऊन मयत पुष्पा हिला मारहाण करत असे. शारीरिक व मानसिक छळ करत असे. तिची सासू सुभद्रा पवार ही तिच्याशी भांडत असे. १५ दिवसांपूर्वी भांडण झाल्यावर बहीण पुष्पा ही गोमळवाडी येथे माहेरी आली होती. नंतर तिचे मावस सासरे त्रिंबक पठाडे (उस्थल खालसा) हे घरी आल्यानंतर त्यांच्या बरोबर पुष्पा हिस तिचे सासरी तामसवाडी येथे पाठविले होते.

काल पुष्पा हिने राहत्या घराच्या छतास गळफास घेऊन आत्महत्या केली. पती अशोक पवार व सासू सुभद्रा पवार यांच्या छळास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.