सेलूतील देवला पुनर्वसन येथील विवाहितेस जाळून मारल्याप्रकरणी पती आणि तिच्या जावेस अतिरिक्त सत्र न्या. एन. एच. बेग यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
सेलूच्या देवला पुनर्वसन कॉलनी येथे िशदे टाकळी येथील अर्जुन अन्सीराम राऊत हा राहतो. अर्जुनचे शीतल हिच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर सासरच्यांनी शीतलकडे माहेराहून पसे आणण्याची मागणी केली होती. या मागणीपोटी तिला त्रास देण्यात येत होता. २४ सप्टेंबर २०१२ रोजी धोंडे जेवण घातले नाही म्हणून रात्री नऊ वाजता जाऊ जनाबाई राऊत हिने शीतलच्या अंगावर रॉकेल टाकले तर पती अर्जुन याने काडी लावून पेटवून दिले. त्यामुळे ती शंभर टक्के जळाली. मृत्युपूर्वी पोलिसांनी नायब तहसीलदार कोलगणे यांच्यासमोर याबाबतचा जबाब दिला होता. त्यावरून सेलू पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. सहायक पोलीस निरीक्षक बी. पी. राठोड यांनी तपास करून सर्व आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील ए. के. दुर्राणी यांनी नऊ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. या प्रकरणी न्यायालयाने अर्जुन राऊत व जना राऊत या दोघांना शीतलचा खून केल्याप्रकरणी जन्मठेप व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील अन्य ७ आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले.