पुलवामा येथील हल्ल्यानंतर आणि एअर स्ट्राईकनंतर सोशल मीडियावर युद्धाच्या पोस्ट करणाऱ्यांना नाशिकमधल्या वीरपत्नीने एक संदेश दिला आहे. निनाद मांडवगणे हा नाशिकचा वैमानिक बुधवारी शहीद झाला. त्यानंतर त्याच्या पत्नीने निनाद मांडवगणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांना विनंती केली आहे की कृपा करून युद्धाच्या पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करू नका. तुमच्यात एवढा जोश असेल तर सरळ सैन्यात सामील व्हा आणि मग खरा अनुभव घ्या असं त्यांनी म्हटलं आहे. यासंदर्भातला एक व्हिडिओही समोर आला आहे.

पहा व्हिडिओ

निनाद हा माझ्या आयुष्याचा, आम्हा सगळ्यांच्या आयुष्याचा भाग होता. आज आमच्या घरातून एक जवान शहीद झाला आहे उद्या कदाचित दुसऱ्या कोणाच्या तरी घरातून होईल. मात्र आम्हाला युद्ध नको. युद्धाचे परिणाम किती भीषण होतात हे सोशल मीडियावर युद्धाच्या पोस्ट करणाऱ्यांना ठाऊक नाही. त्यांनी यासंदर्भातला अनुभव युद्धभूमीवर जाऊन घ्यावा, जोश असेल तर खुशाल सैन्यात सामील व्हा त्यानंतर तुम्हाला कळेल की घरातला माणूस जाण्याचे दुःख काय असते. अशा शब्दात निनादच्या पत्नीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये कोसळलेल्या हेलिकॉप्टरमध्ये २ वैमानिकांसह ६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत नाशिकचे पायलट स्कॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी विजेता, दोन वर्षांची मुलगी, आई वडील आणि धाकटा भाऊ असे कुटुंब आहे. आज त्यांच्या पत्नीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सोशल मीडियावर ज्या पोस्ट करण्यात येत आहेत त्याबद्दल खंत व्यक्त केली आहे.