26 February 2021

News Flash

भाऊबीजेच्या दिवशीच भावाला अखेरचा निरोप देण्याची वेळ, शहीद ऋषीकेश जोंधळेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

ऐन दिवाळीत महाराष्ट्राचे दोन सुपुत्र शहीद

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात ऋषीकेश जोंधळे शहीद झाले आहे. ऋषीकेश जोंधळे हे मुळचे कोल्हापूरचे आहेत. त्यांचं पार्थिव कोल्हापुरातल्या त्यांच्या बहिरेवाडी या मूळगावी आणण्यात आलं. काही वेळापूर्वी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांना निरोप देण्यात आला. आज पाडवा आणि भाऊबीज आहे. भाऊबीजेच्या दिवशीच ऋषीकेश जोंधळे यांच्या चितेला त्यांच्या चुलत भावाने अग्नी दिला. या वीराला निरोप देताना संपूर्ण गाव अश्रूंच्या शोकसागरात बुडालं.

जम्मू काश्मीर मधील उरी सेक्टर आणि गुरेज सेक्टर दरम्यान शुक्रवारी अनेक ठिकाणी युद्धबंदी कराराचे पाकिस्तानने उल्लंघन केले. या गोळीबारात भारताचे पाच जवान शहीद झाले तर तीन नागरिकांचा मृत्यू झाला. या शहीद जवानांमध्ये महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी या गावाचे सुपुत्र ऋषीकेश जोंधळे आणि नागपूर जिल्ह्यातील अंबाडा सोनक गावातील भूषण सतई शहीद झाले. ऐन दिवाळीत महाराष्ट्राचे दोन सुपुत्र सीमेवर शहीद झाले आहेत. त्यामुळे हळहळ व्यक्त होते आहे.

ऋषीकेश यांना त्यांच्या कुटुंबीयांनी सैन्यात जाण्यास विरोध केला होता. मात्र २०१८ मध्ये एकदा प्रयत्न करतो म्हणून त्यांनी घरातल्यांची समजूत काढली. पहिल्याच प्रयत्नात ऋषीकेश हे सैन्यात भरती झाले. त्यांची पहिली पोस्टिंग जम्मू काश्मीरला झाली. गेल्या बुधवारी ऋषिकेश यांचा त्यांच्या वडिलांसोबत फोनवरुन संवाद झाला होता. त्यावेळी त्यांच्या वडिलांना गोळीबाराचा आवाज ऐकू गेला. ऋषिकेश यांना एक लहान बहीण आहे. आज भाऊबीजेचा दिवस हा भावाला ओवाळण्याचा दिवस. मात्र या दिवशीच भावाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ऋषिकेश जोंधळे यांना निरोप देताना सगळं गाव हळहळलं.

पाकिस्तानच्या हल्ल्यात वीरमरण आलेले नागपूरचे भूषण सतई यांनाही आज अखेरचा निरोप देण्यात आला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि उर्जामंत्री नितीन राऊत यांनी भूषण सतई यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण केलं. त्यानंतर काटोल या ठिकाणी भूषण यांचं पार्थिव आणलं गेलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2020 1:01 pm

Web Title: martyr rishikesh jondhale cremated at kolhapur with military honour scj 81
Next Stories
1 जमावबंदीचे आदेश झुगारुन पालखी सोहळ्याचं आयोजन, पोलिसांचा लाठीचार्ज
2 महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता “कृष्णकुंज” – संदीप देशपांडे
3 सावळ्या विठुरायाच्या दर्शनाने भाविकांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणीत
Just Now!
X