News Flash

अरण्यऋषी मारूती चितमपल्ली सोलापुरात परतले

'वृक्षकोषा'चे राहिलेले लेखन सिध्देश्वर तलावाच्या काठावर बसून पूर्ण करण्याचा व्यक्त केला मनोदय

अरण्यऋषी मारूती चितमपल्ली सोलापुरात परतले

जवळपास पाच दशकं विदर्भातील जंगलांमध्ये वास्तव्य करून २५ पुस्तकांची निर्मिती केलेले अरण्यऋषी मारूती चितमपल्ली हे नागपूरचा जड अंतःकरणाने निरोप घेऊन मूळ गावी सोलापुरात दाखल झाले. सोलापूरकरांनीही त्यांचे आत्मीयतेने आणि प्रेमाने स्वागत केले.

वनखात्याच्या नोकरीच्या निमित्ताने मारूती चितमपल्ली हे सुमारे पाच दशके विदर्भातील जंगलांमध्ये राहिले. ‘जंगल’ जगत असताना त्यांनी निसर्ग, पक्षी, प्राण्यांवर विपूल लेखन केले. पर्यावरण तथा निसर्गप्रेमींना उपयुक्त ठरावीत अशी २५ पुस्तके त्यांच्या नावानर नोंद आहेत. त्यांचे आणखी महत्वाचे साहित्य लेखन सुरूच होते. परंतु त्यांच्या पत्नीचे मध्येच निधन झाले. या धक्क्यातून ते सावरत नाहीत, तोच त्यांच्या कन्या छाया यांचे देखील निधन झाले. त्यामुळे ते आणखीच खचले. एकाकी जीवन जगत असताना आता उर्वरीत आयुष्य आपल्या मूळ गावी सोलापुरात व्यतित करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी नागपूरकरांचा जड अंतःकरणाने निरोप घेतला व आपल्या मूळ गावी सोलापूरकडे निघाले. त्यांना वाटेत वर्धा व नांदेडकरांनी देखील निरोप दिला.

सोमवारी ते सोलापुरात आले, अक्कलकोट रस्त्यावर संगमेश्वर नगरात पुतणे श्रीकांत चितमपल्ली यांच्या घरी पोहोचले. दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी त्यांना भेटण्यासाठी सोलापूरकरांची गर्दी होऊ लागली. उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी इर्शाद शेख, वनपाल चेतन नलावडे, शिवाजी गावडे, मुन्ना नरवणे आदींनी मारूती चितमपल्ली यांचा पुष्पगुच्छ आणि वृक्षाचे रोप देऊन सत्कार केला. विदर्भातील जंगलात बसून सुरू केलेले ‘वृक्षकोषा’चे लेखन अपूर्ण असून ते सोलापुरात सिध्देश्वर तलावाच्या काठावर बसून पूर्ण करण्याचा मनोदय चितमपल्ली यांनी बोलून दाखविला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2020 8:03 pm

Web Title: maruti chitampally returned to solapur msr 87
Next Stories
1 माजी आमदार पडवींचा राष्ट्रवादीत प्रवेश माझ्या आदेशानेच-खडसे
2 सरकारनं एका जातीचा विचार केला, ८५ टक्के जनतेचं काय?; आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना सवाल
3 परिवहन मंत्री अनिल परब करोना पॉझिटिव्ह, लीलावती रुग्णालयात दाखल
Just Now!
X