करोना विरोधात लस येईपर्यंत मास्क हीच आपल्यासाठी लस ठरणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. करोनाविरोधातला लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. करोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही. यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता राखण्याची शपथ सर्वांनी घ्यावी असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील प्लाझ्मा थेरेपीसाठीच्या अफेरेसिस युनिटचे उद्घाटन ऑनलाइन प्रणालीने केले. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

कोकणाला लाटांचा सामना कसा करायचा असतो हे शिकवण्याची गरज नाही. करोनाची दुसरी लाट येऊ न देणे ही आपली प्राथमिकता आहे. करोनामुक्त झालेली व्यक्ती एका महिन्यात दोनदा प्लाझ्मा दान करुन चार जणांचा जीव वाचवू शकते त्यामुळे येत्या काळात मृत्यू दरही कमी होईल असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत रत्नागिरीमध्ये झालेलं काम कौतुकास्पद आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. तसंच आगामी काळात जनजागृती करुन करोना रुग्णांची घसरती संख्या आणखी कमी करा असंही आवाहन त्यांनी केलं आहे.