प्रशांत देशमुख

इंग्रजांविरोधातील देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात महत्त्वाचे अस्त्र ठरलेले खादीवस्त्र आता करोना विरुद्धच्या लढय़ात इंग्रजांची सुरक्षा करणार आहे. वर्ध्यातील शुद्ध खादीद्वारे मास्क तयार करून ते लंडनच्या नागरिकांना पुरवले जाणार आहेत.

कुण्या एके काळी  विदर्भातील कापूस लंडन, मॅचेस्टरला जायचा. तेथील गिरण्यातून तयार कापड भारतात विकले जात असे. त्याला उत्तर म्हणून महात्मा गांधींनी खादी वस्त्राची निर्मिती व प्रसार केला होता. आता त्याच लंडनमध्ये गांधी भूमीत तयार खादीवस्त्र सन्मानाने दाखल झाले आहे.  एक महिन्यापूर्वी थेट वर्ध्यातूनच तयार मास्क लंडनला पाठवण्याचे ठरले होते. मात्र  निर्यात बंदी असल्याने पाठवता आले नाही. आता सिंथेटिक मास्क वगळता उर्वरित मास्क पाठवण्यास मुभा मिळाली आहे. परंतु त्यापूर्वीच  विनोबा साहित्य प्रसार केंद्राचे किशोर शहा यांनी भारतातून खादी कापड आणण्यासंदर्भातील सर्व सोपस्कार पूर्ण केले. विनोबा केंद्रात येणारे विदेशी भारतीय तसेच लंडनचे नागरिक हे मास्क तयार करणार असल्याची माहिती ग्रामसेवा मंडळाचे सचिव प्रा. डॉ. अतुल शर्मा यांनी दिली.

करोना संकट उद्भवल्यावर सर्वत्रच मास्कचा तुटवडा जाणवायला लागला तेव्हा ग्रामसेवा मंडळाने सेवाग्रामच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूचनेनुसार सहा इंच रुंद व आठ इंच लांबीचे दुपदरी मास्क तयार करून दिले होते. ते पाहून अन्य संस्थांनी मागणी सुरू केल्यावर मंडळाने महिला बचतगटाचे सहकार्य घेऊन दहा हजार मास्क पंधरा दिवसात पुरवले. टाळेबंदीच्या काळात त्यांना रोजगारही मिळाला व गरजही पूर्ण झाली. गोपुरीतच कधीकाळ वास्तव्य राहलेल्या लंडन निवासी स्वप्नजा व अमित दळवी या अभियंता दांपत्याने सेंद्रिय कापसापासून तयार कापडी मास्कची मोठी नोंदणी (ऑर्डर) मिळवून दिली.

होणार काय?

आचार्य विनोबा भावे यांनी १९३६ साली स्थापन केलेल्या गोपुरीच्या ग्रामसेवा मंडळाने ७० मीटर खादीवस्त्र लंडनला पाठवले आहे. त्यातून तयार होणारे ४० ते ५० हजार मास्क लंडनच्या नागरिकांची गरज भागवतील. लंडन येथेच कार्यरत विनोबा साहित्य प्रसार केंद्राचे किशोर शहा यांनी तेथील तुटवडा लक्षात घेऊन हे सेंद्रिय कापसापासून तयार खादी कापडाच्या मास्कचा पर्याय शोधला आहे. ना नफा, ना तोटा तत्त्वावर हे मास्क विकले जातील.

सेंद्रिय कापूस हा निर्जंतुकीकरणात महत्त्वपूर्ण समजला जातो. त्यापासून तयार मास्क टिकाऊ असतात. इतर मास्कप्रमाणे धुण्याची काळजी नसून केवळ गरम पाण्याने धुतले की पुरेसे आहे. या मास्कवरील निर्यातबंदी उठल्याने पुढील काही दिवसात तयार खादी मास्कचा पुरवठा करण्याचा विचार करू.

-प्रा. डॉ. अतुल शर्मा, सचिव, ग्रामसेवा मंडळ