राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून देशभर ओळख असणाऱ्या परभणीतील सय्यद शाह तुराबूल हक्क दर्गा परिसरात ४५ एकर क्षेत्रावर राज्यातील पहिला पथदर्शी विकास प्रकल्प राबविण्यात येत असून, या साठीचा मिटकॉनच्या वतीने तयार केलेला ‘मास्टर प्लान’ वक्फ मंडळाकडे सादर केला. बांधा, वापरा, हस्तांतरीत करा (बीओटी) या तत्तवावर हा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री फौजिया खान यांनी दिली.
खान यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मागील ५ वर्षांत जिल्हय़ात केलेल्या विकासकामांचा आढावा सादर केला. आरोग्य विभागासाठी १२९ कोटी २७ लाख, शिक्षण विभाग प्राथमिक ४० कोटी ५४ लाख, माध्यमिक शिक्षण विभाग ३३ कोटी ३५ लाख, अल्पसंख्य विभाग ११० कोटी ७३ लाख, महिला व बालविकास विभागासाठी ३७ कोटी ६० लाख निधी शासनदरबारी पाठपुरावा करून आणला. जिल्हय़ात गोदावरी नदीवरील चार बंधाऱ्यांसाठी ६०० कोटी खर्च झाला. या बंधाऱ्यांसाठी आपण सुरुवातीपासूनच पाठपुरावा केल्याचे खान यांनी सांगितले. एकूण ९५१ कोटी ४९ लाख निधीतून गेल्या ५ वर्षांत जिल्हय़ात आरोग्य, शिक्षण, अल्पसंख्याक, महिला व बालविकास विभागात भौतिक सुविधा, साधनसामुग्री व लोकोपयोगी योजनेसाठी खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले.
शहरात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास पाठपुरावा केला. परंतु पहिल्या टप्यात हे काम पूर्ण होऊ शकले नाही. ते दुसऱ्या टप्प्यात पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. प्रत्येक जिल्हय़ात विमानतळ स्थापन करण्यासाठी आपण मंत्रिमंडळ बठकीत मागणी केली. परभणीच्या विमानतळासाठी वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाकडे ३०० एकर जागेची मागणी केली होती. परंतु विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने जमीन देण्यास मंजुरी न दिल्याने हा प्रकल्प सध्या प्रलंबित आहे, अशी माहिती खान यांनी दिली.
सय्यद शाह तुराबूल हक्क दर्गा परिसर विकास व त्या माध्यमातून शहराचा विकास ही संकल्पना सरकारकडे मागितली. या जागेवर बहुउद्देशीय विकास प्रकल्प साकारणे तांत्रिकदृष्टय़ा कठीण होते. परंतु साडेतीन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर बृहत विकास आराखडा तयार झाला. या प्रकल्पाचा व्यवहार्य अभ्यास नामांकित मिटकॉन एजन्सीकडून तयार करून घेण्यात आला. प्रकल्पातंर्गत धार्मिक, शैक्षणिक व व्यावसायिक घटकांचा समावेश आहे. धार्मिक अंतर्गत दग्र्याचा विकास, हज हाऊस, मस्जिद, निवासस्थाने, प्रदर्शन स्थळे, कम्युनिटी हॉल आदी सुविधांचा समावेश आहे. शैक्षणिक घटकांतर्गत शैक्षणिक संकुल, उर्दू, घर, मुला-मुलींसाठी वसतिगृहे, तांत्रिक विद्यालय, तर व्यावसायिक विभागात कंदोरी गृह, स्लॉटर हाऊस, हॉटेल्स, थिएटर्स, व्यापारी गाळे, कल्याणकारी निवासस्थाने,  रुग्णालय, वस्तुसंग्रहालय, बहुउद्देशीय संकुल, सुसज्ज रस्ते, पथदिवे यांचा समावेश आहे.