हैदराबादमधील मुत्थुट फायनान्स कंपनीवर सशस्त्र दरोडा प्रकरणातला मास्टरमाईंड शफीयोद्दीन नवाबोद्दीन सय्यदवली शफी याला तेलंगण पोलिसांनी उस्मानाबादमधून अटक केली आहे. तसंच आग्रा येथील आणखी एका आरोपीला पोलिसांनी उस्मानाबाद शहरातून अटक केली आहे. मुत्थुट दरोडा प्रकरणातला मास्टरमाईंड शफी याला २००२ मध्ये बनावट नोटा प्रकरणात १० वर्षांची शिक्षा झाल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे. ही शिक्षा भोगून आल्यावर पोलीस दलाच्या सीसीएनएस या प्रकल्पात शफीनं कंत्राटी कर्मचारी म्हणूनही काम केलं आहे. मात्र आता त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चिवड्याच्या पिशवीवरून पोलिसांनी शफीचा ठावठिकाणा शोधून त्याला अटक केली आहे.

हैदराबादामधील सायबराबाद या ठिकाणी मुत्थुट गोल्ड फायनान्स या कंपनीच्या कार्यालयावर कारमधून आलेल्या चार दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून लुटीचा प्रय़त्न केल्याची घटना ४ जुलै रोजी घडली होती. त्यानंतर गेल्या १५ ते २० दिवसांपासून पोलीस याप्रकरणी तपास करत होते. शफी हा संगणक अभियंता आहे, त्याच्यावर सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात बनावट नोटांप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. उस्मानाबाद शहरातच शफीनं मुत्थुटवरच्या दरोड्याचा कट आखला अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुत्थुट फायनान्सवर दरोडा टाकण्यात शफी आणि इतरांची टोळी यशस्वी झाली असती पण एका कर्मचाऱ्यानं सायरन वाजवला आणि या सगळ्यांना तिथून पळ काढावा लागला, मात्र या प्रकरणातल्या चारही आरोपींचा शोध पोलीस घेत होते. आता अखेर शफीला उस्मानाबादमधून अटक करण्यात आली आहे. दरोड्याचा प्रयत्न फसल्यावर पोलिसांना चकविण्यात शफी यशस्वी झाला होता. मात्र एका चिवड्याच्या पिशवीवरून आणि स्वीटमार्टच्या पत्त्यावरून पोलीस उस्मानाबादमध्ये पोहचले. दरोडा टाकण्याआधी आरोपींनी याच दुकानातून काही वस्तू खरेदी केल्या होत्या.

दरोड्याचा प्रयत्न फसल्यावर गाडी सोडून हे चारही जण पसार झाले आणि त्यांच्या गाडीमध्ये स्वीटमार्टची आणि चिवड्याची पिशवी तशीच राहिली. पोलिसांना ही गाडी सापडली आणि त्यानंतर चिवड्याच्या पिशवीवर असलेल्या पत्त्याचा आधार घेत पोलीस उस्मानाबादमध्ये पोहचले आणि शफीच्या मुसक्या आवळल्या.