– विनोद पोखरकर

मी हिंदू, मी मराठी यातून मराठा म्हणून आपण कधी विचार करणार आहोत की नाही? हिंदू म्हणून न्याय मिळाला? मराठी म्हणून न्याय मिळाला? तर नाही. आजवर केवळ मराठा समाजाने हिंदुत्व आणि मराठीपण जपलं आहे मराठा म्हणून आपली कधीच ओळख नव्हती म्हणूनच इतकी वर्षे समाजाला न्याय मिळाला नाही पण तरी आज ही आपण तेच करतोय. अमराठी सोडा आजवर इतके मराठा आणि मराठी मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार नेते झाले मग मराठा समाजाला न्याय का मिळाला नाही? मग आज ही आपण त्याच गुलामीत राहायचं का? मागची ४० वर्ष सोडा मागच्या चार वर्षात सत्ताधारी आणि विरोधकांनी मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काय केलं? तर उत्तर येत काहीच नाही मग तरी ही आपण मूर्खासारखं यांच्यावर विश्वास ठेवून यांच्या मागे फिरायचं का.?

आज लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत कुठला पक्ष आणि नेता समाजाच्या मागण्यांवर, फसवणुकीवर बोलतोय? एक दोन मराठा लोकप्रतिनिधी सोडले तर आज ही इतर लोक लांबून मजा घेत आहेत पण समाजावर झालेल्या अन्यायावर तोंडसुख घेण्यापलीकडे जाऊन काही करत नाहीत. काही भक्त आणि लाचार सांगतायेत लोकसभा ही देशाची भूमिका, नेतृत्व ठरवते देशाचा विचार करून आपण आमक्या तमक्या पक्षासोबत राहायला हवं मग मराठे काय देशाबाहेर राहतात का? नाही ना मग त्याच मराठा समाजावर आजवर इतक्या मोठ्या प्रमाणात अन्याय झाला तेव्हा हे भक्त, लाचार, गुलाम कुठे होते? इतकी वर्षे आपण काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान केलं मागची पाच वर्ष जनतेने मोठ्या अपेक्षेनं भाजप शिवसेनेवर विश्वास दाखवून केंद्रात आणि राज्यात बहुमताने त्यांना निवडुन दिलं. वाटलं होतं हे काही तरी करतील पण मराठा सामाजाचा विचार करायचा झाला तर मागच्या ४० वर्षात समाजाचं जितकं नुकसान झालं नाही त्यापेक्षा अधिक आर्थिक आणि सामाजिक नुकसान मागच्या ४ वर्षात झालं लोकशाहीच्या मार्गाने लढा देऊन समाजाच्या पदरी काय पडलं? जर काहीच पडलं नाही तर मग यांच्या मागे आपण का उभं राहायचं?

मराठा समाजाने आता स्वतःचा विचार करण्याची वेळ आली आहे स्वतःची वोट बँक बनवायची वेळ आली आहे. लोकसभेला ट्रेलर दाखवू आणि विधानसभेला पिक्चर रिलीज करू. विधानसभेला २०० जागा जरी लढवल्या तरी २० जागा सहज निवडून येतील. सत्ताधारी आणि विरोधकांच्या ८० जागा तर हमखास पडतील. आजवर दोघांनी ही आपल्याला गृहीत धरलं आहे आता मतदानातून आपली ताकत दाखवण्याची वेळ आली आहे. येत्या दोन दिवसात उमेदवार जाहीर होतील, तरी लोकसभा निवडणुकीत ज्या ज्या ठिकाणी आपले उमेदवार उभे असतील पूर्ण ताकतीने त्यांच्या सोबत उभं रहा आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा…

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मराठा समाजच ठरवेल हे नक्की…

(लेखक मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत)