नागरी रुग्णालय केवळ संकल्पनेतच; पर्यायी व्यवस्थेबाबतही प्रशासकीय उदासीनता
नीरज राऊत, लोकसत्ता
पालघर : पालघर येथे राज्य शासनाची वैद्यकीय शिक्षण विभागाचे आरोग्य पथक व प्रसूतीगृहाची इमारत धोकादायक स्थितीत असतानाही तेथे प्रसूती, दंतचिकित्सा, लसीकरण करण्याची जोखीम अद्यापही घेतली जात आहे. नागरी रुग्णालय उभारण्याची संकल्पना तत्पूर्वी तात्पुरत्या पर्यायी व्यवस्थेबाबतही प्रशासकीय हालचाली दिसत नसल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.
पालघर शहरात १९४८ साली उभारलेल्या माता बाल संगोपन केंद्राच्या या धोकादायक इमारतीमध्ये ग्रँड वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालयातर्फे आरोग्य पथक व प्रसूतिगृह चालवले जाते. या ठिकाणी गरोदर मातांची तपासणी, प्रसूती, लसीकरण तसेच दंत चिकित्सा विभाग कार्यरत आहे. या ठिकाणी सुमारे ४२ कर्मचारी-अधिकारी सेवेत आहेत. या पथकातर्फे बंदाठे, केळवे, खारेकुरण, शिरगाव, वडराई व उमरोळी येथे उपकेंद्र चालवले जात आहेत.
पालघर येथील प्रसूतिगृहाची ही इमारत धोकादायक असल्याचे सुमारे अडीच वर्षांंपूर्वी जाहीर करण्यात आले. याठिकाणी असलेले शस्त्रक्रिया विभाग बंद आहे. तर प्रसूतिगृहाची अवस्था बिकट आहे. अशा परिस्थितीतही दर महिन्याला ३० ते ४० प्रसूती या केंद्रांमध्ये होत आहेत.
वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत असलेल्या केंद्रांमध्ये उपलब्ध जागेचा तसेच कर्मचारी-वैद्यकीय अधिकाऱ्यांचा वापर करून त्याचा ग्रामीण रुग्णालयाशी सलंग्न करून हंगामी नागरी रुग्णालय (मिनी सिव्हिल हॉस्पीटल) उभारण्याची संकल्पना सन २०१८ मध्ये पुढे आली होती. त्याला वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी २७ नोव्हेंबर २०१८ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे व तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या बैठकीत सहमती दर्शवली होती. तर आरोग्य पथक अंतर्गत असलेली इमारती धोकादायक स्थितीत असल्याने पालघर येथील ग्रामीण रुग्णालयातील विस्तारित क्षेत्रांमध्ये स्वतंत्र प्रसूती कक्ष स्थापन करून दोन्ही आरोग्य केंद्रांच्या कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून त्यांना हंगामी नागरी रुग्णालयात सामावून घेण्याचा विचार निश्चित झाला होता. मात्र करोना संक्रमणाच्या काळात याबाबत पुढे कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे आहे त्या स्थितीत काम सुरू आहे.
या संदर्भात पालघरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल थोरात यांच्याशी संपर्क साधला असता ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध जागेत आरोग्य पथकातील कर्मचारी व आरोग्य अधिकारी यांची सेवा घेऊन प्रसूती कक्ष अधिक प्रभावीपणे सुरु करण्यास हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
‘महिला रुग्णालयासाठी जागा मिळावी’
मुळात ग्रामीण क्षेत्रांमध्ये वैद्यकीय सेवा पुरविण्याच्या दृष्टीने आरोग्य पथकाची निर्मिती झाली आहे. परंतु पालघरचे शहरीकरण झाले आहे. त्यामुळे आगामी काळात वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत असलेले हे केंद्र जिल्ह्यातील दुर्गम भागात स्थलांतरित करावे तसेच पालघर येथे नागरी रुग्णालय कार्यरत झाल्यानंतर आरोग्य पथक व सध्या असलेले ग्रामीण रुग्णालयाची जागा एकत्रित करून त्या ठिकाणी स्वतंत्र जिल्हा महिला रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे.
प्रशासकीय, लोकप्रतिनिधींचा निरुत्साह
पालघर येथे तात्पुरती सोय म्हणून हंगामी नागरी रुग्णालय स्थापन करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण विभाग या दोन विभागांचा समन्वय आवश्यक असून त्यासाठी पुढाकार कोणी घ्यावा हा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णालय उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरीसुद्धा त्याचे काम पूर्ण होण्यास किमान अडीच ते तीन वर्ष लागण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यातील लोक प्रतिनिधी तसेच पालकमंत्री यांच्याकडून या प्रस्तावाबाबत कोणत्याही प्रकारची पाठपुरावा होत नसल्याचे दिसून आल्याने सर्वसामान्य नागरिकाला शासकीय वैद्यकीय सेवेपासून वंचित राहावे लागत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 7, 2021 3:02 am