चार महिन्याच्या विश्रांतीनंतर माथेरानची राणी मंगळवार पासून पुन्हा एकदा सेवेत दाखल होणार आहे. नवीन पारदर्शक आणि वातानुकूलित डब्यांचा साज यावेळी माथेरानच्या राणीला असणार आहे. त्यामुळे नव्याकोऱ्या रेल्वेची उत्सूकता टिपेला पोहोचली आहे.  पावसाळ्यातील चार महिने नेरळ ते माथेरान दरम्यानची रेल्वे सेवा बंद ठेवली जाते. पावसाळ्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याची शक्यता असते, त्यामुळे पर्यटकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला जातो. ब्रिटीशकाळापासून पावसाळ्यात बंद असणारी माथेरानची रेल्वे सेवा १६ ऑक्टोबर पासून पुन्हा कार्यरत केली जाते.  गेल्या १५ जून २०१८ रोजी मिनीट्रेनची नेरळ-माथेरान-नेरळ सेवा बंद करण्यात आली होती. त्याकाळात मिनीट्रेनचे प्रवासी डब्बे दुरुस्त करण्याची तसेच अन्य कामे करण्यात आली.याच कालावधी मध्ये मिनीट्रेनसाठी एनडीएम १-४०२ आणि ४०३ ही दोन नवीन इंजिने तयार होऊन आली आहेत. याच श्रेणीमधील दोन इंजिने यापूर्वीच मिनीट्रेनच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. त्यामुळे नवीन पर्यटन हंगामात अमन लॉज-माथेरान या शटल सेवेबरोबर नेरळ-माथेरान-नेरळ या मार्गावरील पर्यटन हंगाम देखील गर्दीचा व्हावा यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत

मिनीट्रेनचा प्रवास पर्यटकांना आनंद देणारा ठरावा यासाठी प्रवासी डब्बे आकर्षक करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याप्रमाणे पारदर्शक छत असलेले प्रवासी डब्बे तयार केले आहेत. त्या डब्यातुन प्रवास करताना मिनीट्रेनच्या मार्गावरील वेडीवाकडी वळणे,दरया खोरया अनुभवता येणार आहेत. दुसरीकडे या पारदर्शक प्रवासी डब्यांवर माथेरान मधील रस्त्यावर चालणारे घोडे,जंगलातील पक्षी-प्राणी,प्रेक्षणीय स्थळे,बाजारपेठ,यांची चित्रे रेखाटली आहेत. दुसरीकडे या गाडीला एक वातानुकूलीत प्रवासी डब्बा जोडला जाणार आहे. त्यासाठी दोन प्रवासी डब्बे नेरळ लोको मध्ये पोहचले आहेत. या वातानुकूलित डब्यात एका वेळी २२ प्रवासी बसू शकणार आहेत. डब्ब्यात दोन्ही बाजूला दीड टन क्षमतेचे वातानुकूलित यंत्र बसविण्यात आले असून एलईडी टीव्ही देखील लावण्यात आला आहे. त्यामुळे माथेरानच्या राणी उत्सूकता टिपेला पोहोचली आहे. नव्या रंगाढंगातील ही मिनीट्रेन येत्या मंगळवार अर्थात १६ ऑक्टोबर पासून सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • मिनीट्रेनला एक वातानुकूलित डब्बा
  • पारदर्शक आणि आकर्षक रंगसंगती असलेले डबे
  • दोन नवीन रेल्वे इंजिनही दाखल
  • वातानुकूलित डब्यात एलसीडी टिव्हीची व्यवस्था