डिसेंबरमध्ये अमन लॉज-माथेरान मिनी ट्रेन सेवा सुरू

पावसामुळे मोठे नुकसान झालेल्या माथेरानमधील मिनी ट्रेनची अमन लॉज ते माथेरान शटल सेवा डिसेंबर अखेरीस नाताळच्या मुहूर्तावर सुरू होणार आहे. त्यासाठी नेरळ ते माथेरान मार्गावर विविध कामे हाती घेण्यात आली असून सहा कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. नेरळ ते माथेरान अशी संपूर्ण सेवा सुरू होण्यासाठी चार महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे मिनी ट्रेन मार्गावर मोठे नुकसान झाले. रुळांखालील माती वाहून जाण्याबरोबरच मोठय़ा प्रमाणात दगड, चिखलही आला. रुळांचेही नुकसान झाले. या मार्गावरील कामांसाठी एक वर्ष लागणार असल्याने मिनी ट्रेन त्वरीत सुरू होणार नसल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले होते. स्थानिकांना नेरळ ते माथेरान वाहतुकीसाठी मिनी ट्रेन हाच एक मोठा पर्याय आहे. नेरळ ते अमन लॉजपर्यंत टॅक्सी सेवा आणि त्यानंतर पुढे माथेरानपर्यंत पायी चालण्याशिवाय स्थानिक आणि पर्यटकांना पर्याय नाही. त्यामुळेच किमान अमन लॉज ते माथेरान शटल सेवा सुरू करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली होती. त्यासाठी आंदोलनाचाही पवित्रा घेतला होता. त्यानंतर मध्य रेल्वेने शटल सेवा लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.

मध्य रेल्वेने निविदा काढून मिनी ट्रेन मार्गावरील विविध कामे कंत्राटदारांना सोपवली आहेत. यासाठी सहा कोटी रुपये खर्च असून ती कामे पंधरा दिवसांपूर्वीच सुरू झाली आहेत. प्रथम शटल सेवा असलेल्या मार्गावर काम केले जात असून येथील कामे साधारण एका महिन्यात पूर्ण केले जातील. त्यानंतर मिनी ट्रेनची चाचणी करून डिसेंबर अखेरीस शटल सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन मार्गावरील काम मोठय़ा प्रमाणात केली जातील. त्यामुळेच येथील संपूर्ण सेवा सुरू करण्यासाठी थोडा अवधी लागेल. साधारण चार महिन्यात संपूर्ण नेरळ ते माथेरान मिनि ट्रेन सुरू करण्यासाठी लागतील.