नवीन कार्यप्रणालीसह तीन इंजिन्स नेरळमध्ये दाखल

पर्यटकांच्या सुरक्षेचे कारण पुढे करीत बंद झालेली नेरळ-माथेरान दरम्यानची मिनी ट्रेन सेवा वर्षभरानंतर पुन्हा एकदा सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा केली नसली, तरी नवीन कार्यप्रणालीसह तीन नवीन रेल्वे इंजिन मुंबईहून नेरळ येथे दाखल झाली आहेत.

माथेरान येथून नेरळ येथे जात असलेल्या मिनी ट्रेनचे प्रवासी डब्बे एकाच आठवडय़ात दोन वेळा नॅरोगेज रुळावरून खाली उतरले होते. त्यानंतर लगेच प्रवाशांच्या सुरक्षेचे कारण पुढे करीत नेरळ-माथेरान ही घाटात धावणारी मिनी ट्रेन सेवा गेल्या ९ मे २०१६ रोजी बंद करण्यात आली. तेव्हापासून ही रेल्वेसेवा खंडित होती.

रेल्वेसेवा अनिश्चित काळासाठी बंद केल्यानंतर याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले होते. पर्यटक, स्थानिक लोकप्रतिनिधी, व्यापारी, पर्यटन व्यावसायिकांनी रेल्वेसेवा सुरळीत व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यात हस्तक्षेप करीत माथेरानची रेल्वेसेवा बंद केली जाणार नाही, अशी ग्वाही दिली होती. यानंतर रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते. रेल्वे मार्गावरील धोकादायक ठिकाणी रिटेिनग वॉल्सची उभारणी केली जात होती. रेल्वे इंजिन्सच्या कार्यप्रणालीत काही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

यानंतर सर्व इंजिन्स नेरळ येथून मुंबईतील कुर्ला कार्यशाळेत नेण्यात आली होती. या कार्यशाळेत जुन्या इंजनांच्या कार्यप्रणालीत काही बदल केले गेले तर एअर ब्रेकप्रणालीने सज्ज असणाऱ्या तीन नवीन रेल्वे इंजिन्सची बांधणी करण्यात आली. त्यातही गरजेनुसार काही बदल करण्यात आले. आता हे सर्व इंजिन्स पुन्हा एकदा नेरळ येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे माथेरानची खंडित झालेली रेल्वेसेवा पुन्हा एकदा सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या सर्व इंजिनांची सध्या नेरळ ते माथेरानदरम्यान चाचणी केली जात आहे. रेल्वेसेवा कधी सुरू होणार? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी सुरक्षा चाचण्या पूर्ण झाल्यावर नेरळ-माथेरानदरम्यान रेल्वेसेवा पुन्हा सुरू होईल, असा विश्वास रेल्वे सूत्राकडून व्यक्त केला जात आहे.