एका आठवडय़ात दुसऱ्यांदा रेल्वेचे डबे घसरल्याने माथेरानची रेल्वेसेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलण्यात आल्याचे रेल्वे सूत्रांकडून सांगितले जात आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे माथेरानच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जाते आहे.

मध्य रेल्वेमार्फत नेरळ ते माथेरानदरम्यान मिनी ट्रेन चालवली जाते, तर अमन लॉज ते माथेरानदरम्यान शटल सेवा सुरू असते. आता या दोन्ही रेल्वे सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. एकाच आठवडय़ात एकाच ठिकाणी दोन वेळा माथेरान रेल्वेचे डबे घसरल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

ऐन पर्यटन हंगामात हा निर्णय घेण्यात आल्याने माथेरानमध्ये नाराजीचा सूर आहे. माथेरानचे अर्थकारण हे या रेल्वे सेवेवर अवलंबून आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी मिनी ट्रेन हे प्रमुख आकर्षणाचे केंद्र आहे. रेल्वे सेवा खंडित झाल्याने पर्यटकांच्या पदरी निराशा येत आहे, तर माथेरानला दैनंदिन सामानाची, भाजीपालाची आणि किराण्याची रसदही बंद झाली आहे. मालवाहतुकीचा किफायतशीर मार्ग बंद झाल्याने महागडय़ा पर्यायी मार्गावर अवलंबून राहण्याची वेळ माथेरानकरांवर आली आहे.

रेल्वे मार्ग, डबे आणि इंजिनांची योग्य निगा राखली जात नसल्याने रेल्वे सेवा सातत्याने विस्कळीत होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. रेल्वेची वेगमर्यादाही कमी करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वी पावणेदोन तासांत नेरळहून माथेरानला येणारी रेल्वे कधीकधी तीन ते चार तास घेत आहे. रेल्वेला २१ ठिकाणी घालून देण्यात आलेली वेगमर्यादा याला कारणीभूत ठरत आहे.

माथेरानच्या रेल्वेत बसायला मिळेल या आशेने आम्ही इथे आलो होतो. मात्र इथे आल्यावर रेल्वे बंद असल्याचे सांगण्यात आले. आमचा इथे येण्याचा उत्साह निघून गेला. असे  पर्यटकअंकित तितर यांनी सांगितले.

रेल्वे घसरण्याचे कारण पुढे करून नेरळ-माथेरान रेल्वे सेवाच बंद करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाकडून घातला जातोय, तो माथेरानच्या पर्यटन उद्योगाचा मुळावर येणारा आहे. असे माथेरानचे नगरसेवक संतोष पवार यांनी सांगितले.

अपघात झाला म्हणून रेल्वे सेवाच बंद करणे हा रोगापेक्षा इलाज भयंकर असा प्रकार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांना माथेरान रेल्वे चालवण्याची इच्छाच दिसून येत नाही. नेरळ मार्गाची सुरक्षा चाचणी होईपर्यंत अमन लॉज ते माथेरान शटल सेवा सहज सुरू ठेवता आली असती. असे  माजी नगराध्यक्ष  मनोज खेडकर यांनी सांगितले.