२१ मे १८५० रोजी प्रकाशात आलेले निसर्गरम्य पर्यटनस्थळ असा सर्वदूर लौकिक असलेल्या माथेरानचा १६३वा वाढदिवस अत्यंत थाटात साजरा करण्यात आला. माथेरान प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित माथेरान महोत्सवामध्ये या वाढदिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सिद्धिविनायक मंदिर (मुंबई) विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सुभाष मयेकर, माधवबाग विश्वस्त मंडळाचे मुख्य विश्वस्त भिकूभाई चितलिया, सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त बिना शाह, धनंजय बरदोडे, माथेरानचे माजी नगराध्यक्ष दिलीप गुप्ता, सहाय्यक पोलीस निरीक्षक ओनील मयेकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या माथेरानच्या वाढदिवस सोहळ्यानिमित्त रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गणेश भगत प्रस्तुत गंध सुरांचा या वाद्यवृंदाने गीत-संगीत-नृत्यावर पर्यटकांना डोलायला लावले. मराठी, हिंदूी, दक्षिणात्य भाषेतील गाणी कार्यक्रमात सादर करण्यात आली.
वाढदिवसाच्या मुख्य कार्यक्रमात माथेरान प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय सावंत, उपाध्यक्ष विवेक चौधरी, उपनगराध्यक्षा प्रतिभा घावरे यांनी प्रमुख मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी माथेरानच्या नकाशाची प्रतिकृती असलेला केक कापून माथेरानच्या वाढदिवसाचा जल्लोष करण्यात आला. यावेळी नगरसेवक राजेश दळवी, चंद्रकांत जाधव, दिनेश सुतार, नगरसेविका हिरावती सकपाळ, सुनीता आखले, वंदना शिंदे, सुनीता पेमारे या उपस्थित होत्या. माथेरानकरांच्या आरोग्यविषयक सुविधांसाठी सिद्धिविनायक विश्वस्त संस्था कटिबद्ध असल्याची ग्वाही अध्यक्ष सुभाष मयेकर यांनी याप्रसंगी दिली.
माथेरानच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या रंगतदार सांस्कृतिक सोहळ्यास नागरिक व पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.