लग्न जुळवणाऱ्या एका मॅट्रिमोनियल वेबसाईटने भाजपा नगरसेवकाच्या संमतीविनाच त्याच्या लग्नाचा फोटो जाहीरातीसाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारत मॅट्रिमोनी या वेबसाईटने पुण्यातील भाजप नगरसेवक सम्राट थोरात (२७) यांचा लग्नातील फोटो जाहीरातीसाठी वापरला. वेबसाईटने कुठलीही पूर्वपरवानगी न घेता हा फोटो वापरला असे सम्राट यांचे म्हणणे असून या प्रकरणी त्यांनी खासगी तक्रार दाखल केली आहे.

सम्राट यांना नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून त्यांचा लग्नातील फोटो मॅट्रिमोनियल वेबसाईटवर प्रसिद्ध झाल्याचे समजले. माझ्या आयुष्यातील खासगी समारंभातील फोटो वेबसाईटने कुठलीही माहिती न देता परस्पर वापरला. असे करुन वेबसाईटने माझी फसवणूक केली तसेच माझी बदनामी झाली आहे असे सम्राट यांनी सांगितले.

वेबसाईटच्या माध्यमातून तुमची ओळख झाली का ? अशी विचारणा करणारे फोन कॉल्स, मेसेजेस येऊ लागल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. सम्राट थोरात यांचा ऐश्वर्या भोसले बरोबर १५ मे २०१५ रोजी पुण्यात विवाह झाला. ऐश्वर्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अजय भोसले यांची मुलगी आहे. मॅट्रिमोनियल वेबसाईटवरुन नव्हे तर हे दोन्ही कुटुंबांनी परस्पर सहमतीने ठरवून केलेले लग्न आहे असे सम्राट यांनी सांगितले.

लग्नानंतर सम्राट आणि ऐश्वर्याने फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटसवर त्यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले होते. सम्राटने भारत मॅट्रिमोनीच्या मॅनेजर विरोधात खासगी तक्रार दाखल केली आहे. कोर्टाने खडक पोलिसांना या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश देताना तीन दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.