जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले निनाद मांडवगणे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. निनाद मांडवगणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी नाशिकच्या गोदाकाठावर लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बडगाममध्ये कोसळलेल्या हेलिकॉप्टरमध्ये २ वैमानिकांसह ६ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये नाशिकचे पायलट स्कॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे यांचाही समावेश होता.

निनाद यांच्या मागे त्यांच्या पत्नी विजेता, दोन वर्षांची मुलगी, आई वडील आणि धाकटा भाऊ असे कुटुंब आहे. निनाद यांचं पार्थिव सकाळी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलं होतं. अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता. दोन वर्षांची चिमुकली आपल्या वडिलांना अखेरचा निरोप देताना पाहून अनेकजण भावूक झाले. डीजीपीनगर येथून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली होती. हवाई दलाने मानवंदना दिल्यानंतर लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कऱण्यात आले.

नाशिकचे निनाद औरंगाबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या (एसपीआय) २६ व्या कोर्सचा माजी विद्यार्थी होते. तिथून त्यांची निवड पुणे येथे एनडीएमध्ये झाली. त्यानंतर ते हेलिकॉप्टर पायलट झाले. बुधवारी सकाळी हेलिकॉप्टरच्या अपघातात निनादचा मृत्यू झाला. डीजीपीनगर नाशिकचे निनाद यांचा जन्म १९८६ ला झाला होता. निनाद यांचे शिक्षण (पाचवी ते दहावीपर्यंत) भोसला मिलिटरी मध्ये तर ११ वी आणि १२ वीचे चे शिक्षण औरंगाबादच्या सैनिकी संस्थेत झाले होते. नंतर त्यांनी बी. ई. मेकॅनिकल इंजिनीयरिंग पूर्ण करून हैद्राबाद ट्रेनिंग कमिशन मध्ये ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर २००९ ला एअर फोर्समध्ये स्कॉड्रन लीडर पदावर सेवेत रुजू होऊन गुवाहाटी, गोरखपूर येथे सेवा करून एक महिन्यापूर्वीच श्रीनगर येथे बदली झाली होती. ज्यानंतर ही दुःखद घटना घडली आहे.

निनाद यांचे वडील बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत होते. आता ते सेवानिवृत्त झाले असून आईही सेवेतून सेवानिवृत्त झाली आहे. निनाद हा त्यांचा मोठा मुलगा असून लहान मुलगा जर्मनीत सी. ए. पदावर सेवेत आहे. आमच्या कुटुंबाचा आधारच गेला अशी प्रतिक्रिया त्याच्या आई वडिलांनी दिली आहे.