04 August 2020

News Flash

नकली माव्याचा व्यापार

गुजरातमधील साठा खासगी बसमधून वसई-विरारमध्ये

(संग्रहित छायाचित्र)

प्रसेनजीत इंगळे

सणासुदीचा काळ सुरू होताच वसई-विरार शहरात गुजरातमधून मोठय़ा प्रमाणावर नकली माव्याची तस्करी सुरू झालेली आहे. हा मावा शहरातील मिठाईवाल्यांकडे वितरित करून त्यापासून मिठाई तयार केली जाते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा कोटय़वधी रुपयांचा हा धंदा सुरू आहे. मात्र पालिकेचा आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही.

वसईत मागील वर्षी मोठय़ा प्रमाणावर नकली माव्यापासून मिठाई तयार करणारे कारखाने पोलिसांनी उद्ध्वस्त केले होते. गणेशोत्सवाचे आगमन काही दिवसांवर आले असून पुन्हा नकली मावा शहरात चोरटय़ा मार्गाने तस्करी करून आणला जाऊ  लागला आहे.

बनावट मावा राजस्थान आणि गुजरातवरून आणला जातो. यासाठी टेम्पो वा ट्रकचा वापर न करता प्रवासी बस वापरल्या जातात. सूत्रांनी दिली. यात गोदामापासून निघालेल्या बसगाडय़ा चारोटी टोलनाक्यावर काही अंतरावर येऊन थांबतात. नंतर सांकेतिक भाषेचा वापर करून सकाळी अधिकाऱ्यांच्या बदलीच्या वेळेत बस टोलनाक्यातून पार करून वसईत दाखल होतात.

सर्व टोलनाक्यांवर मावा माफियांचे खबरे पेरलेले असतात. या बस वसईत दाखल झाल्यानंतर एखाद्या सोयीच्या हॉटेलसमोर उभ्या केल्या जातात. तेथून वसई-विरार, ठाणे आणि मुंबईत घाऊक व्यापाऱ्यांकडे वितरित केला जातो. हे सर्व साखळी पद्धतीने चालते.

नकली मावा दोन्ही पद्धतीने येतो. यातील  केक स्वरूपात आणि दुसरा गोणीत येतो. यात प्रामुख्याने कृष्णा केक, बन्सी बर्फी, आर सी स्पेशल मावा, या नावांचे मुदत संपलेले मावा आणि काही ठिकाणी कोणतेही नाव नसलेला नकली मावा दाखल झाले आहेत. मावा साठवण आणि विक्री करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचा परवाना आवश्यक असतो. तसेच या माव्याची साठवणूक १० अंश सेल्शियस तापमानात करणे आवश्यक असते.

माव्याचा वापर

अगदी माफक दरात मिठाईवाले हा मावा विकत घेतात. आणि त्यात पुन्हा दूध मिसळून घोटाई करतात यामुळे या माव्याची चव सुधारली जाते. आणि त्यापासून मिठाई बनवली जाते.

आरोग्यास घातक

दुधात युरिया वा अपमार्जके (डिर्टजट) तसेच कमी प्रतीचे डालडा टाकून मावा तयार केला जातो. अशा प्रकारच्या माव्यापासून तयार केलेली मिठाई जास्त दिवस टिकते. ही मिठाई घातक असते.

आमची कारवाई नियमित सुरू आहे, सणांच्या तोंडावर अशा प्रकारचा मावा येत असल्याची माहिती आमच्याकडे प्राप्त झाली आहे. त्यानुसार सापळे रचून आम्ही कारवाई करत आहोत.

– प्रकाश वाघमारे, सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2019 12:23 am

Web Title: mawa counterfeit trade in vasai virar abn 97
Next Stories
1 पूरक आहाराचे काम शिक्षकांच्या माथी
2 रक्षाबंधनातून वृक्षसंवर्धनाचा संदेश
3 मीरा-भाईंदरमधील नागरी समस्यांवर शनिवारी सर्वागीण चर्चा
Just Now!
X