सुमारे तीन वर्षांचा पुरेसा कालावधी मिळूनदेखील अकार्यक्षम, निष्क्रिय प्रशासन चालविल्याचा आक्षेप असलेले पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांची बदली आज-उद्या अपेक्षित असून त्यांच्या ठिकाणी कार्यक्षम व कर्तव्यकठोर पोलीस आयुक्त लाभावा, अशी आशा सोलापूरकर बाळगून आहेत.
जेमतेम सात पोलीस ठाण्यांची संख्या असलेल्या सोलापूर पोलीस आयुक्तालयात मागील तीन वर्षांचा अनुभव पाहता कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणारा, वाढत्या गुन्हेगारीला वेसण घालणारा कार्यक्षम, पारदर्शक व कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त मिळण्याच्या प्रतीक्षेत सोलापूरकर आहेत. सध्याच्या भाजप-सेना राजवटीत राजकीय हितसंबंध दुखावल्यामुळे पालिकेचे धडाकेबाज आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली झाली असली तरी उशिरा का होईना पालिकेला तेवढाच आश्वासक आयुक्त लाभला आहे. जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे हे उत्कृष्टरीत्या प्रशासन चालवत आहेत. इतर वरिष्ठ अधिकारीही तुलनेने कार्यक्षम लाभल्याचे दिसून येते. परंतु शहर पोलीस आयुक्तांविषयी नागरिकांची निराशा झाली आहे. रासकर यांची कारकीर्द उठावदार अशी झालीच नाही. त्यांच्या कार्यकाळात केवळ सुदैवाने एखादी मोठी दंगल झाली नाही, एवढीच जमेची बाजू. या पाश्र्वभूमीवर पालकमंत्री विजय देशमुख यांनी मनावर घेतल्यास खऱ्या अर्थाने कायदा व सुव्यवस्था राखणारा, गुन्हेगारांचा बंदोबस्त करून पोलीस प्रशासनाविषयीची विश्वासार्हता जनमानसात वाढविणारा पोलीस आयुक्त सोलापूरला लाभू शकेल. नव्हे तर तशाच पोलीस आयुक्ताची सोलापूरला गरज असल्याचे बोलले जाते.
शरीर व मालाविषयक वाढती गुन्हेगारी, विशेषत: रस्त्यावर एकटय़ा-दुकटय़ा महिलांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांची होणारी लूट, गल्लीबोळात बोकाळलेली गुंडगिरी, सतत होणाऱ्या छोटय़ा-छोटय़ा दंगली, वाढते खंडणीचे प्रकार, डॉल्बीच्या अतिरेकामुळे पर्यावरण संरक्षण कायद्याची होणारी गळचेपी, गुंम्डांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून तक्रार दिलीच तर कोणतीही खातरजमा न करता निष्पाप व सभ्य व्यक्तीलाही परस्परविरोधी गुन्ह्य़ात दरोडा, जबरी चोरीसारख्या गंभीर आरोपाखाली अडकावणे, फिर्याद नाकारणे, स्थान माहात्म्य न पाहता अवैध धंदे बोकाळणे व त्याविषयी लक्ष वेधले तरी पोलिसांचे दुर्लक्ष असणे, एमपीडीएसारखी प्रतिबंधात्मक कारवाई सहज होऊ शकेल, अशा सराईत गुन्हेगारांना अभय अशा स्वरूपाचे चित्र गेल्या तीन वर्षांत प्रकर्षांने दिसून आले आहे. यात आणखी धक्कादायक बाब म्हणजे पोलीस खात्यातीलच गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही महाभाग कार्यरत असतात. वरिष्ठ अधिकारी व राजकीय पुढाऱ्यांचे हितसंबंध सांभाळणे, अवैध धंद्यांमध्ये भागीदारी आहे की काय, इथपर्यंत शंका उपस्थित होणे, संपूर्ण पोलीस आयुक्तालयाला आपल्या तालावर नाचविणे, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सुमारे २५ नामचिन पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होत नाही. वास्तविक पाहता अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस मुख्यालयात नियुक्त केले तरी त्यांचे कारनामे थांबत नाहीत. त्यांना किमान जिल्ह्य़ाबाहेर पाठविण्याची गरज असल्याचे पोलीस खात्यातील काही अधिकारी खासगीत सांगतात. तसे गोपनीय अहवाल असल्याचे समजते.