02 June 2020

News Flash

‘नगरोत्थान’ रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

शहरातील रेंगाळलेल्या नगरोत्तान योजनेतील रस्त्यांच्या कामांना तातडीने चालना देण्याचा आदेश महापौर अभिषेक कळमकर यांनी दिला.

| June 16, 2015 04:00 am

शहरातील रेंगाळलेल्या नगरोत्तान योजनेतील रस्त्यांच्या कामांना तातडीने चालना देण्याचा आदेश महापौर अभिषेक कळमकर यांनी दिला. रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे कामही तातडीने हाती घेऊन त्याचा दर्जा व गती यासाठी यातील आधुनिक तंत्राचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
महापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कळमकर यांनी सोमवारी प्रथमच शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेतला. या बैठकीस आमदार अरुण जगताप, माजी आमदार दादा कळमकर यांच्यासह उपमहापौर सुवर्णा कोतकर, मनपातील सभागृहनेते कुमार वाकळे, अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, सभापती नसीम शेख, गटनेते समद खान, नगरसेवक दीप चव्हाण, उपायुक्त भालचंद्र बेहेरे, अजय चारठाणकर आदी या वेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेंतर्गत शहरातील सहा रस्त्यांची कामे सुरू आहेत. यातील कोठी रस्ता, बालिकाश्रम रस्ता, केडगाव देवी रस्ता या तीन रस्त्यांवरील अडथळे प्रामुख्याने दूर करणे गरजेचे आहे. नगररचना, अतिक्रमण विरोधी विभाग व बांधकाम विभाग यांनी एकत्रित मोहीम आखून हे अडथळे तातडीने दूर करून या रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. केडगाव पाणीयोजना व शहरातील फेज-२ या योजनांचाही कळमकर यांनी आढावा घेतला. यंत्र अभियंता परिमल किम यांनी याबाबतची माहिती दिली. कोतकर यांनी या वेळी केडगाव येथे नळजोड देण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याची तक्रार केली. ती लक्षात घेऊन हे काम कालबद्ध मुदतीत पूर्ण करण्याच्या दृष्टीने हालचाली करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
शहरात स्वच्छतेच्या दृष्टीने प्रभावी मोहीम राबवण्याच्या सूचना कळमकर यांनी केल्या. ते म्हणाले, पावसाळय़ाचे दिवस लक्षात घेऊन स्वच्छतेसाठी यंत्रणा अधिक सतर्क असली पाहिजे. कचराकुंडय़ा वेळच्या वेळी साफ केल्या पाहिजे, रस्त्यांची सफाई योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहांची स्वच्छताही नियमित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वसुलीला चालना देण्यासाठी मालमत्ता करातील प्रकरणे त्वरित निकाली काढावी, शहरातील उद्याने खासगी संस्थांना चालवण्यास देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना कळमकर यांनी दिल्या. बैठकीतील सूचना, आदेशांचे तातडीने पालन व्हावे, त्यात कुचराई झाल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही त्यांनी या बैठकीत दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2015 4:00 am

Web Title: mayor abhishek kalamkar ordered complete works of city regeneration roads immediately
Next Stories
1 दलित वस्तीच्या कामांची मंजुरी आता जि.प.कडे
2 महापौर शेख मिस्त्री यांचे जात प्रमाणपत्र बनावट
3 औरंगाबाद जिल्ह्य़ात ५१ ग्रामपंचायतींकडून ‘मिनरल वॉटर’!
Just Now!
X