महापौरांच्या अधिकारात वाढ करायला हवी, अशी शिवसेनेची भूमिका आहे. अधिकारात वाढ केल्याने शहर विकासाच्या वेगवेगळ्या कार्यालयांवर नियंत्रण ठेवता येणे शक्य होईल, असे मत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. शहरातील राज्य रस्ते महामंडळाच्या वतीने सुरू असणाऱ्या पुलांच्या कामाची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर या कामांसाठी निधीची कमतरता आहे. ती कशी पूर्ण करणार आणि कामाला वेग कसा देणार, असे विचारले असता महापौरांच्या अधिकारामध्ये वाढ होण्याची आवश्यकता आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
 शहरातील सिडको बसस्थानकाजवळील उड्डाण पूल, मोंढा नाका येथील उड्डाण पूल व रस्त्यांची पाहणी त्यांनी केली. औरंगाबाद शहरातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी पुढच्या तीन महिन्यात पुन्हा येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील रस्ते, नालेसफाई व उड्डाणपुलांच्या कामांना गती देता यावी यासाठी औरंगाबाद येथे आल्याचे सांगत उड्डाणपुलांच्या कामासाठी आवश्यक असणारा अधिकचा निधी मंजूर करून घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासमवेत विशेष बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. एका पुलाचे काम महिनाभरात पूर्ण होईल आणि अन्य दोन पुलांची कामे डिसेंबपर्यंत पूर्ण होतील, असे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर त्र्यंबक तुपे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट आदी सहभागी झाले.
केंद्र, राज्य आणि महापालिकेत तीनही स्तरावर युतीचे सरकार असल्याने कामाला वेग आल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. शहरातील रस्त्यांच्या पलीकडे अन्य कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.