22 September 2019

News Flash

नव्या महापौर बंगल्याचे आरेखन तयार

पाच बेडरूम, होम थिएटरचा समावेश

पाच बेडरूम, होम थिएटरचा समावेश

महापौरांचे नवीन कायमस्वरूपी निवासस्थान शिवाजी पार्कमध्येच पालिकेच्या क्रीडा भवनाच्या जागेवर बांधले जाणार असून त्याकरिता आराखडा तयार करण्यात आला आहे. क्रीडा भवनाच्या सुमारे २ हजार ७४५ चौरस मीटर क्षेत्रात हा बंगला बांधला जाणार आहे. पाच शयनकक्ष, होम थिएटर, जलतरण तलाव, हिरवळ अशा सोयीसुविधा या नव्या बंगल्यात असतील. इंग्रजी यू आकाराच्या या निवासस्थानाच्या बांधणीसाठी ७ ते ८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

शिवाजी पार्क येथील जुन्या महापौर बंगल्याची जागा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या महापौरांसाठी तात्पुरते निवासस्थान म्हणून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पालिकेच्या बंगल्यात पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईच्या महापौर पदाला साजेसा बंगला उभारण्याचे पालिकेने ठरवले असून त्यानुसार आराखडा तयार करण्यात आला आहे. या बंगल्यासाठी सन २०१९-२० या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद करून या प्रकल्पाकरिता खातेही उघडण्यात आले आहे. नवीन विकास आराखडय़ात क्रीडा भवनाच्या जागेचे आरक्षण बदलून ते बंगल्यासाठीचे आरक्षण दाखवण्यात आले आहे. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये पालिकेच्या क्रीडा भवनात महापौर निवासस्थान बांधण्यात येणार आहे, तर  पालिका अधिकाऱ्यांसाठी महालक्ष्मी येथे क्रीडा भवनासाठी पर्यायी जागा देण्यात येणार आहे. क्रीडा भवनाची एकूण जागा २७४५ चौरस मीटर असून त्यापैकी ११०० चौरस मीटरवर बंगला बांधण्यात येणार आहे.

नव्या बंगल्याची वैशिष्टय़े

  • तळमजल्यावर स्वयंपाकघर, लिव्हिंग रूम, होम थिएटर, स्टडी रूम असेल.
  • पहिल्या मजल्यावर पाच शयन कक्ष असतील.
  • बाजूलाच एक कार्यालयीन इमारत ज्यात वेटिंग रूमची व्यवस्था असेल. तसेच मीटिंग घेण्यासाठी तीन खोल्या असतील.
  • एक मोठे सभागृह असेल ज्यात एकाच वेळी २०० लोक बसू शकतील.

First Published on August 26, 2019 1:08 am

Web Title: mayor of mumbai vishwanath mahadeshwar shivaji park mpg 94