औरंगाबाद शहराचे १९वे महापौर म्हणून शिवसेनेचे त्र्यंबक तुपे, तर उपमहापौरपदी भाजपच्या प्रमोद राठोड यांची बुधवारी निवड झाली. तुपे यांना ७१, तर राठोड यांना ७० मते मिळाली. अपक्ष व बहुजन समाज पार्टीने दिलेल्या पाठिंब्यामुळे मोठय़ा फरकाने युतीचे महापौर-उपमहापौर निवडले गेले. महापौर निवडणुकीत एमआयएमला २६, तर काँग्रेसला १३ मते मिळाली. बसपचे २ सदस्य तटस्थ राहिले. एका अपक्ष नगरसेविकेने सभागृहात हजर असूनही मतदानात सहभाग नोंदवला नाही.
मनपाची विशेष सभा सुरू झाल्यानंतर अर्जाची छाननी करण्यात येऊन अर्ज मागे घेण्यास वेळ देण्यात आला. युतीत ठरल्याप्रमाणे अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे युतीच्या विरोधात एमआयएम आणि काँग्रेसचे उमेदवार रिंगणात होते. एमआयएमचे गंगाधर ढगे यांना २६, तर काँग्रेसचे अफसर खान यांना १३ मते मिळाली. बहुतांश अपक्ष नगरसेवक शिवसेनेकडेच असल्याचे या वेळी दिसून आले. भाजपने अपक्ष आपल्याकडे येतील, यासाठी बरेच प्रयत्न केले, मात्र तसे घडले नाही. शिवसेनेचे २८ नगरसेवक निवडून आले, तर एक नगरसेवक पुरस्कृत होता. यात १५ अपक्षांची भर पडली. भाजपला २२ जागा मिळाल्या. यात ६ अपक्ष नगरसेवकांची भर पडली. बसपचे राहुल सोनवणे व सुनीता चव्हाण यांनी मतदानात तटस्थ राहण्याचे ठरवले, तर जोहरबी कुरेशी यांनी मतदानात सहभाग नोंदविला नाही. उपमहापौर निवडणुकीत एका मुस्लीम अपक्ष नगरसेवकाने भाग घेतला नाही.
महापौर निवडीसाठी सकाळपासूनच तयारी सुरू होती. साडेदहाच्या सुमारास एमआयएमचे नगरसेवक महापालिकेत घोषणा देत आले. पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे पुरुष नगरसेवकांनी शेरवानी घातली होती. ‘एमआयएम जिंदाबाद व ओवेसी जिंदाबाद’च्या घोषणा त्यांनी दिल्या. त्यानंतर भाजपचे नगरसेवक महापालिकेत दाखल झाले. त्यांनी भगवे फेटे घातले होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा त्यांनी दिल्या. त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांसह अपक्ष नगरसेवकही आले. त्यांनी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, अशा घोषणा दिल्या. नगरसेवकांबरोबर पक्षाचे नेतेही दाखल झाले. खासदार चंद्रकांत खैरे, भाजपचे सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर, आमदार अतुल सावे, संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी काम पाहिले. निवडीनंतर पालकमंत्री रामदास कदम यांनी औरंगाबाद शहराच्या विकासाचा वेग वाढेल, असा दावा केला.
गेले महापौर कोणीकडे?
महापौरपदी सेनेच्या त्र्यंबक तुपे यांची निवड झाली. पदभार स्वीकारताना महापौराला पाहावे आणि शुभेच्या द्याव्यात, म्हणून पालकमंत्री कदम, खासदार खैरे, भाजपचे सरचिटणीस ठाकूर, आमदार सावे, डॉ. भागवत कराड ही मंडळी दालनात वाट पाहात बसली. महापौर काही येईनात. निवड झाल्यानंतर ते कोठे गेले, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. तेव्हा कळले, की ते वृत्तवाहिन्यांशी बोलत आहेत. ते लवकर येत नाहीत, असे लक्षात आल्यावर पालकमंत्री बाहेर पडले. ते बाहेर पडले, हे समजताच महापौरही त्यांच्यामागे गेले. पालकमंत्री विश्रामगृहावर गेले. तिकडेच महापौरही गेले. त्यांचा सत्कार करण्यासाठी आणि पदभार देण्यासाठी मावळत्या महापौर कला ओझा यांच्यासह बाकी नेतेमंडळी ताटकळली. महापौरांना बोलवण्यासाठी आठ-दहा जणांना पाठवण्यात आले. खासदार खैरे यांनी बरीच चिडचिड केली. अखेर महापौरांऐवजी उपमहापौरपदाचा पदभार सोपविण्याचा विधी पहिल्यांदा झाला. तोपर्यंत महापौर गेले कोणीकडे? असेच प्रत्येक जण एकमेकांना विचारत होता.
महापौरांआधी उपमहापौरांचा पदभार
रंगला सोहळा बिस्किटाने!
भाजप-सेनेचा उपमहापौर होणार, हे मंगळवारीच निश्चित होते. प्रशासनाने प्रक्रिया पूर्ण केली. महापौरपदी शिवसेनेचे त्र्यंबक तुपे व उपमहापौरपदी भाजपचे प्रमोद राठोड यांची नियुक्ती झाली. ढोल वाजले, गुलाल उधळला गेला, फटाक्यांची आतषबाजी झाली. नेते खूश झाले. पण ऐनवेळी भुकेजलेल्या नेत्यांना ‘बिस्किटे’देखील मिळाली नाहीत, म्हणून त्यांनी सुभेदारी विश्रामगृह गाठले. त्यांच्या पाठोपाठ महापौरही तिकडेच गेले आणि पदभार देण्यास नेते एवढा वेळ ताटकळले, की शेवटी भाजपच्या नेत्यांनी खासदार चंद्रकांत खैरे व अन्यजणांना विनंती केली, आधी उपमहापौर राठोड यांना पदभार देऊ आणि मग महापौर येतील तेव्हा त्यांनाही पदभार देऊ. त्यामुळे महापालिकेत निवडीनंतर महापौरांआधी उपमहापौरपदाचा कारभार हस्तांतरित करण्यात आला.
महापौरपदी निवड झाल्याचे जाहीर होताच खासदार खैरे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आदी नेते मावळत्या महापौर कला ओझा यांच्या दालनात बसले होते. नवीन महापौरांना राजदंड देऊन पदभार देण्याची प्रक्रिया दालनात होणार होती. त्यामुळे पालकमंत्री रामदास कदमही दालनात आले. चर्चा आणि गप्पांना रंग चढला. तेव्हा चहापाणी, बिस्किटांची काही व्यवस्था आहे का, असे पालकमंत्र्यांनी विचारले. महापौरांना डिवचत ते असेही म्हणाले, ‘काय हो, तुम्ही एवढीपण व्यवस्था करीत नाही. नुसत्याच कशा ‘गणपती’सारख्या बसता?’ तेव्हा मावळत्या महापौर खजील झाल्या. शिपायाला बोलावण्यासाठी त्या वारंवार ‘बेल’ वाजवत राहिल्या. आणलेली बिस्किटांची पिशवी कोणीतरी पळविली, असेही त्यांचे म्हणून झाले. शेवटी पालकमंत्र्यांनीच खैरे यांना विनंती केली. कार्यकर्त्यांची पळापळ झाली. पण पालकमंत्र्यांना बिस्किटे काही मिळाली नाहीत. त्यांना मधुमेह असल्याने काहीतरी खाणे आवश्यक होते. मात्र, तसे काहीच न सांगता ते दालनातून निघाले. जाताना म्हणाले, ‘महापौर कोठे आहेत? बोलवा त्यांना’. तेव्हा कळले, ते वृत्तवाहिन्यांशी बोलत आहेत. त्यांना उशीर होत होता, म्हणून पालकमंत्री दालनातून निघाले. कोणीतरी कार्यकर्त्यांने महापौरांना सांगितले, ‘पालकमंत्री निघून गेले’. तसे महापौरांनी पालकमंत्र्यांकडे धाव घेतली. पुढे ते दोघेही सुभेदारी विश्रामगृहात गेले. महापौर दालनात याची कोणालाच माहिती नव्हती. फोनाफोनी सुरू झाली. कोठे आहेत महापौर, असे खैरे विचारू लागले. त्यांना येथे दालनात बोलवा, असे म्हणत त्यांनी ८-१० कार्यकर्त्यांना पिटाळले. दरम्यान, कोणीतरी सांगितले, ते दोघेही सुभेदारीवर आहेत. महापौरच नाहीत, तर पदभार द्यायचा-घ्यायचा कसा, असा प्रश्न काही वेळ निर्माण झाला. दरम्यान, मावळत्या महापौर कला ओझा यांना खैरे यांनी पुन्हा एकदा खुर्चीत बसवले आणि ‘बसा १५ मिनिटे. तुम्हाला काही वेळ संधी मिळाली आहे,’ असे म्हटले. अस्वस्थता वाढत होती.
दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी घाई सुरू केली. त्यांना येण्यास उशीर असेल तर उपमहापौर राठोड यांना पदभार देऊ. आमची सगळी तयारी आहे, असे सांगण्यात आले आणि अखेर शिवसेनेचे नेतेही त्यास तयार झाले. तो पदभार देऊन झाला आणि मग महापौर त्र्यंबक तुपे त्यांच्या दालनात आले. मोठी घोषणाबाजी झाली. ते आले आणि मावळत्या महापौर ओझा यांनी त्यांची खुर्ची त्यांच्या हवाली केली. राजदंडही त्यांच्या हाती देण्यात आला. खासदार खैरे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख दानवे यांच्यासमक्ष पदभार देऊन झाला होता. तेवढय़ात पालकमंत्री पुढे आले. पुन्हा त्यांच्यासमोर पदभार दिला, घेतला गेला. वेळेवर बिस्किटे मिळाली असती, तर एवढे सगळे घडलेच नसते, असे म्हणण्याची वेळ शिवसेना नेत्यांवर आली. अगदी खैरेसुद्धा महापौरांना म्हणाले, ‘यांनी बिस्किटांची व्यवस्था करायला पाहिजे होती.’ नंतर पालकमंत्र्यांनी गैरसमज नको, ‘मी मधुमेह असल्याने काहीतरी खाण्यासाठी गेलो होतो,’ असा खुलासा केला, मात्र त्यामुळे महापालिकेत पदभाराचा सोहळा भलताच रंगला.

thackeray Shiv Sena, Vijay Devane , Lakhs of Kolhapur Public , Spokespersons for Shahu Maharaj, Defeat Sanjay Mandlik, kolhapur lok sabha seat, lok sabha 2024, maha vikas aghadi,
लाखो जनताच शाहू छत्रपतींचे प्रवक्ते; तेच मंडलिकांना पराभूत करतील -विजय देवणे
Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
Hatkanangale election
कोल्हापूर : राहुल आवाडे हातकणंगलेच्या रिंगणात; मशाल हाती घेणार ?
loksatta chavadi maharashtra politics maharashtra political crisis 
चावडी: शुक्राचार्य कोण ?