News Flash

कोकणातील पाणी वळवण्यास माकपचा विरोध

पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खो-यात वळविण्यासाठी कळसूबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात वळण बंधारे बांधण्याच्या योजनेस मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने तीव्र विरोध दर्शविला आहे.

| July 2, 2013 12:15 pm

पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खो-यात वळविण्यासाठी कळसूबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात वळण बंधारे बांधण्याच्या योजनेस मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने तीव्र विरोध दर्शविला आहे. वळण बंधा-याच्या माध्यमातून पश्चिम घाटातील समृध्द जैववैविध्याशी छेडाछेड न करण्याचा इशारा देतानाच आपल्या वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड येथील संपन्न निसर्गाचा बळी देण्यास निघाले असल्याची बोचरी टीका पक्षाच्या तालुका समितीने एका पत्रकाद्वारे केली आहे.
अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातील घाटमाथावर पडणा-या पावसाचे कोकणात वाहन जाणारे पाणी मुळा व प्रवरा नद्यांच्या खो-यात वळविण्याची मागणी पिचड यांनी शासनाकडे केली आहे. मुळा खो-यातील हरिश्चंद्रगड पर्वतावरच्या तसेच प्रवरेच्या पाणलोट क्षेत्रातील साम्रद नाला व हिवरा नाला, वळण बंधा-यांद्वारे पाणी वळविण्याची योजना आहे. त्यामुळे सुमारे पाच टीएमसी पाणी तुटीच्या गोदावरी खो-यासाठी उपलब्ध होणार आहे. पिचड यांचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवण्याचे आश्वासन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी दिले असून या योजनेच्या अभ्यासासाठी एक द्विसदस्यीय समिती नियुक्त केली. मात्र अभयारण्य क्षेत्रातील ही योजना असतानाही समितीत वनविभागाचा प्रतिनिधी नाही तसेच पर्यावरणतज्ज्ञाचा समावेशही नाही. याबद्दल या पक्षाने आश्चर्य व्यक्त केले आहे. या योजनेचा येथील निसर्ग, जैवविविधता व पर्जन्यमान यावर काय परिणाम होईल याच्याशी शासनाला काहीच देणेघेणे नसल्याचे त्यामुळे स्पष्ट होत असल्याची टीका या पक्षाने केली आहे. मानवी हव्यासातून निसर्गातून केलेल्या अमर्याद छेडाछेडीचे जीवघेणे परिणाम उत्तराखंडात आज  देश भोगत आहेत. यातून  आपण काहीच धडा घेणार नाही का, असाही सवाल या पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.
पाच टीएमसी पाणी वळविल्यावर हरिश्चंद्रगड परिसरातील नैसर्गिक जलवहनावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. तसेच सह्याद्रीचा हा घाटमाथा जैववैविध्याने अत्यंत समृध्द असून सूक्ष्म जीवजंतूंपासून वन्यप्राण्यांपर्यंत नानाविध प्रजातींचा हा अधिवास आहे. वळणबंधारे बांधण्यामुळे होणा-या मानवी हस्तक्षेपातून या अधिवासाला मोठय़ा प्रमाणात धक्का बसणार आहे. अभ्यास समितीत या अंगाने विचारच होऊ नये अशा पद्धतीने पर्यावरणतज्ज्ञ व वनविभागाला टाळून समिती बनविली गेल्याने समितीच्या हेतूबद्दलच शंका उपस्थित झाल्याचा दावा पक्षाने केला आहे.
अकोले तालुक्यात यापूर्वीही विविध विकासकामांमुळे नैसर्गिक संपत्तीची अमर्याद हानी झाली आहे याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. निसर्गाच्या हानीमुळे तालुक्यातील पर्जन्यमान दरवर्षी कमी होत असून त्याचा शास्त्रीय अभ्यास करण्याची अत्यंत गरज आहे. हा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी समिती नेमा अशी मागणी पक्षाच्या राज्य समितीचे सदस्य डॉ. अजित नवले, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष यादव नवले, तुळशीराम कातोरे, सुरेश भोर आदी पक्ष कार्यकर्त्यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 12:15 pm

Web Title: mcps objection for diversion to water of konkan
टॅग : Konkan
Next Stories
1 जत,आटपाडी, कवठेमहांकाळमधील अनेक गावे अद्याप टँकरच्या प्रतीक्षेत
2 ‘कन्याकुमारी ते इस्लामाबाद’ सायकल मोहीम
3 निराधार मुलगा हॉटेलचा शेफ झाला!
Just Now!
X