तळोजानंतर ‘एटीएस’ची मोठी कारवाई

मुंबई : राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) तळोजानंतर सांगली येथे एमडी या घातक अंमलीपदार्थ निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. २०१६ पासून तेथे एमडीचे उत्पादन सुरू होते.

एटीएसने या प्रकरणी सरदार पाटील याला अटक केली आहे. हा आरोपी २०१५ मध्ये सांगली येथील ओमकार इंडस्ट्रीज या औषधनिर्मिती कारखान्यात कनिष्ठ निर्मिती पर्यवेक्षक या पदावर नोकरी करत होता. त्या वर्षी महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) या कारखान्यावर छापा टाकत मोठय़ा प्रमाणावर एमडीचा साठा हस्तगत केला. या कारवाईत डीआरआयने कारखान्याचे मालक रवींद्र कोंडुस्कर यांना अटक केली होती. तेव्हा येथे एमडी नावाचा अंमलीपदार्थ तयार होतो हे पाटीलला समजले. त्याने एमडी तयार करण्यासाठी आवश्यक असलेले रासायनिक समीकरण, प्रक्रिया समजून घेतली. त्यानंतर पाटील नवी मुंबईतील जितेंद्र परमार याच्या संपर्कात आला. परमारने पाटीलला सांगली येथील घराजवळ भाडय़ाची जागा, यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली. पाटीलने तयार केलेले एमडी परमार आणि टोळी बाजारात विकू लागली. प्रत्येक किलोमागे पाटीलला ५० हजार रुपये मिळत होते.

एटीएसने गेल्या आठवडय़ात तळोजाजवळील वलप भागातील परमारचा एमडी निर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला होता. या कारवाईत परमार, पाटीलसह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे. १३३ किलो एमडी, एक कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे.