अत्याचार झाल्यानंतर इतक्या वर्षांनी सगळ्यांना जाग का येते? घटना घडली तेव्हाच आवाज का नाही उठवला असा सवाल ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी विचारला आहे. Me Too मोहीमेबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी आपले मत व्यक्त केले. १० वर्षांनी अशाप्रकारे आरोप करणे चुकीचे आहे असेही त्या म्हणाल्या. काळजात कळ उठते तेव्हा माणूस गप्प राहू शकत नाही. त्यामुळे अत्याचार झाला तेव्हाच आवाज उठवायला हवा असे त्यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात एका कार्यक्रमासाठी कार्यक्रमाप्रसंगी पत्रकारांशी बोलतना सिंधुताईंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पुढे त्या म्हणाल्या, आता या मोहीमेमुळे जे दोषी नाहीत त्यांनाही विनाकारण शिक्षा भोगावी लागेल. आरोप करणारी महिला ही ज्याप्रमाणे कुणाची तरी पत्नी, बहिण, आई आहे त्याचप्रमाणे पुरुषही कोणाचा तरी मुलगा, वडिल, भाऊ असतात. सध्या जगभरात आणि विशेषत: भारतात MeToo चे वादळ सुरु असून अनेक महिला आपल्यावर बऱ्याच वर्षापूर्वी झालेला अत्याचार यानिमित्ताने सांगत आहेत. अभिनेत्री तनुश्री दत्ता हीने नाना पाटेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर या मोहीमेने जोर धरला होता. त्यानंतर अभिनेते अलोकनाथ, दिग्दर्शक साजिद खान, कैलाश खेर, विकास बहल, अनु मलिक यांसारख्या नामवंत मंडळींची नावे पुढे आली होती.