पायी घराकडे निघालेल्या परप्रांतीय मजुरांसाठी राज्य सरकारतर्फे सुरू करण्यात आलेली मोफत बससेवा मध्य प्रदेशातील सेंधव्यापर्यंतच आहे. त्या ठिकाणापासून  मजूर, कामगारांना पुन्हा पायी प्रवास करावा लागतो. त्यामुळे देवासपर्यंत बससेवा द्यावी, बसगाडय़ांची संख्या दुप्पट करावी, अशी मागणी समन्वय समिती सदस्या मेधा पाटकर यांनी केली आहे.

पाटकर यांनी जिल्हाधिकारी संजय यादव यांची भेट घेतली. राज्यात कामासाठी आलेल्या मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी शासनाने कोणतीही पावले उचलली नव्हती. त्यामुळे नाइलाज म्हणून हे मजूर पायी घराकडे निघाल्याचे पाटकर यांनी सांगितले. उपोषण केल्यानंतर राज्य सरकारने मोफत बससेवा सुरू केली. त्यात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारकडे जाणाऱ्या मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडले जाते. परंतु, मध्य प्रदेश सरकारने या मजुरांसाठी कोणतीही व्यवस्था केलेली नसल्याने त्यांना पुढे जाण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यांना पुन्हा पायी जावे लागते. या स्थितीत धुळ्यापासून सेंधव्यापर्यंत असलेली बससेवा देवासपर्यंत वाढवावी, अशी मागणी पाटकर यांनी केली. धुळ्यातून थेट गोंदिया या ९०० किलोमीटरवर असलेल्या ठिकाणी मजूर, विद्यार्थ्यांंना पोहचविण्यासाठी बससेवा दिली जात असतांना दुसरीकडे मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत म्हणजे केवळ शंभर, सव्वाशे किलोमीटपर्यंत बस दिली जाते. त्यामुळे घरी जाणाऱ्यांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केल्यानंतर रविवारी केवळ २२ बस सोडण्यात आल्या. त्यातून दोन हजार नागरिकांचा प्रवास झाला. घरी जाणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता गाडय़ांची संख्या वाढविण्याची मागणी त्यांनी केली. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, महावीर संघवी उपस्थित होते.