परभणी जिल्ह्याच्या तुलनेत चंद्रपूर, गोंदिया, उस्मानाबाद हे जिल्हे निकषात बसत नसतानाही त्यांना शासकिय वैद्यकीय महाविद्यालये बहाल केली जात आहेत. मात्र निकषात बसत असतानाही परभणी जिल्ह्यावर शासनाकडून अन्याय केला जात आहे. त्यामुळे निकषात बसत नसणार्‍या जिल्ह्याला डावलून परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्यात यावे, असा आक्रमक पवित्रा परभणीकरांनी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत घेतल्यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे. परभणीकरांचा आक्रमक पवित्रा पाहून उस्मानाबादकरांच्या मागणीला खो बसणार मागील की मागील पावसाळी अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे उस्मानाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावास मंजुरी मिळणार हे अधिवेशनात स्पष्ट होणार आहे.

नीती आयोगाच्या निकषात देशात तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून सातत्याने केली जात आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी उस्मानाबादमध्ये झालेल्या महाआरोग्य मेळाव्यात  लवकरच उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर विधान परिषदेत मराठवाडा आणि विदर्भातील वैद्यकिय प्रवेशाच्या संख्येवर आमदार सतीश चव्हाण, आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह बारा लोकप्रतिनिधींनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन यांनी पुढील शैक्षणिक वर्षापासून उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार असल्याचे सभागृहातील आपल्या भाषणात जाहीर केले होते.

परभणी जिल्ह्याच्या तुलनेत इतर काही जिल्हे निकषात बसत नाहीत. त्यात उस्मानाबादसह चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. असे असताना वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयासाठी त्यांना हिरवा कंदिल दिला जातो, आणि परभणी जिल्ह्याबाबत सापत्न भूमिका घेतली जात आहे. जोपर्यंत परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळत नाही, तोपर्यंत विविध आंदोलने सुरू राहतील, असा इशाराही परभणीकरांनी दिला आहे.

परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा ताबडतोब करण्यात यावी, असा दबाव वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत परभणीकरांनी टाकला. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबादला की, परभणीला ? असा नवा पेच आता वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसमोर उभा ठाकला आहे. परभणीकरांचा वाढता जनरेटा त्याला परभणी जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडून मिळणारे पाठबळ उस्मानाबादच्या मागणीला खो घालतात की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे सामान्य उस्मानाबादकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी रस्त्यावर यायला तयार नाहीत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबादलाच : ठाकूर 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबाद येथे सुरू होणार यात दुमत नसल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली आहे.

अधिवेशनात निधीची तरतूद करावी -आमदार पाटील

मंत्री महोदयांनी उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार, अशी दोनवेळा घोषणा केली आहे. मात्र त्यानंतर निधीची तरतूद करणे अपेक्षित होते. तसे घडले नाही अनेक वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी उस्मानाबादकारांनी लावून धरली आहे त्यासाठी आता निधीची तरतूद करण्यात यावी असे  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.