28 September 2020

News Flash

Coronavirus : शिक्षण विभागाकडे केवळ ७०० स्वसंरक्षण ड्रेस

चीनमधून किट आणण्याची तयारी

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

– संदीप आचार्य

करोनाबाधितांवर थेट उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी आवश्यक असेलेल्या पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट ( पीपीइ) ची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कमतरता असल्याने चीनमधून हे पीपीइ किट मागविण्याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाने मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे परवानगी मागितली आहे. सध्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे केवळ ७०० पीपीइ किट उपलब्ध आहेत.

मुंबई महापालिकेने करोनाशी लढाई करण्यासाठी जय्यत तयारी केली असून महापालिकेकडे आजघडीला ८,७०० पीपीइ किट डॉक्टरांसाठी उपलब्ध आहेत. त्याचवेळी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील १८ वैद्यकीय महाविद्यालयांसाठी केवळ ७०० पीपीइ किट उपलब्ध असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीची संपूर्ण जबाबदारी पालिकेने जानेवारीपासून आजपर्यंत पार पाडली असून आतापर्यंत २,७०,००० लोकांची पालिकेच्या डॉक्टरांनी तपासणी केली. यासाठी ४५ डॉक्टर व १५ पॅरामेडिकल अहोरात्र कार्यरत होते. कस्तुरबा रुग्णालयात जानेवारीत केवळ २८ विलगीकरण खाटा होत्या त्या वाढवून ४०० खाटांपर्यंत व्यवस्था करण्यात आली. करोनाचा धोका लक्षात घेऊन पालिकेने २१०० विलगीकरण खाटांची व्यवस्था करण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे या खाटांची व्यवस्था केईएम, शीव व नायर रुग्णालयाशिवाय अन्यत्र पालिका रुग्णालयात केली जाणार असल्याचे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. पालिकेकडे पुरेसे एन ९५ मास्क तसेच करोना चाचणीसाठी सहा प्रयोगशाळा असतील. यातील कस्तुरबा प्रयोगशाळेसह काही ठिकाणची चाचणी करण्याची क्षमता वाढविण्यात आली आहे. पालिकेने सुमारे २२२ रुग्णवाहिकांची तयारी ठेवली असून जिथे आवश्यक आहे तेथे पालिका वैद्यकीय कर्मचारी घरी जाऊन करोना संशयितांची सॅम्पल गोळा करतात. आतापर्यंत पालिकेने घरोघरी जाऊन ३९ हजार सॅम्पल गोळा केली असून २४ तास चालणारी हेल्पलाईन सुरू केली आहे. १९१६ या हेल्पलाईनवर लोकांच्या प्रश्नांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून उत्तरे दिली जात आहेत.
या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाने आता राज्यात १० ठिकाणी करोना चाचणीसाठी प्रयोगशाळा सुरू केल्या असून १८ वैद्यकीय महाविद्यालयात ‘फ्लू क्लिनिक’ सुरू केल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. या क्लिनिकमध्ये संशयित रुग्णांची तपासणी व चाचणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय जे जे ग्रुपच्या सेंट जॉर्ज व जीटी रुग्णालयात तसेच पुणे येथील बीजे वैद्यकीय महाविद्यालय स्वतंत्रपणे करोना रुग्णांवर उपचार केले जातील, असे अमित देशमुख यांनी सांगितले.

चीनमधून पीपीइ किट मागविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने मुख्य सचिवांकडे परवानगी मागितल्याबाबत विचारले असता पीपीइसह ज्या गोष्टींची करोनाच्या लढाईसाठी गरज लागेल त्या मिळतील तेथून घेण्याची ब्लँकेट परवानगी आपण सचिवांसह संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ तात्याराव लहाने म्हणाले की, आमच्याकडे डॉक्टरांना संरक्षण देता येतील यासाठी एचआयव्हीचे किट तसेच अन्य व्यवस्था आहे. आता नव्याने आवश्यकतेनुसार पीपीइ किट घेण्याचे काम सुरू आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी याबाबत पूर्ण सहकार्य दिले आहे.

करोनाचे रुग्ण आता गोंदियातही आढळून आले आहेत. आगामी काळात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील १८ वैद्यकीय महाविद्यालयांना महत्वाची भूमिका बजवावी लागेल हे लक्षात घेऊन आम्ही तयारी सुरू केली आहे. आरोग्य विभागाशी तसेच सर्व संबंधित विभागांशी समन्वय ठेवून आम्ही काम करू, असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2020 10:04 am

Web Title: medical education department have only 700 kits
टॅग Coronavirus
Next Stories
1 मुस्लीम बांधवांनी सामुदायिक नमाजचा अट्टाहास टाळावा – शमसुद्दीन तांबोळी
2 करोनाग्रस्तांसाठी राज्यात एक हजार रुग्णालयं उपलब्ध, उपचारही मोफत
3 लोकसत्ताचा ई पेपर वाचा एका क्लिकवर
Just Now!
X