सिडको, हडको भागात डेंग्यूचे आठ रुग्ण आढळले. मात्र, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी जयश्री कुलकर्णी स्वच्छता व धूर फवारणीच्या कामाकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप मनपाच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केला. बहुतांश नगरसेवक आक्रमक झाल्याने कुलकर्णी यांना अखेर सभागृह सोडावे लागले. दरम्यान, काही नगरसेवक जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला. होणाऱ्या त्रासाविषयी महिला आयोगाकडेही तक्रार करणार असल्याचे सांगत महापालिका आयुक्तांनाही त्यांनी पत्र दिले.
शहराच्या एन ९ व एन ११ भागात नुकतेच डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने घबराट पसरली. सभागृह नेते किशोर नागरे यांनी रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेतली होती. गुरुवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत स्वच्छता व धूर फवारणीच्या मुद्दय़ावरून काही नगरसेवकांनी कुलकर्णी यांना धारेवर धरले. आरोग्य विभागात अगदी छोटी कामेही होत नसल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. मनपा आरोग्य अधिकारी जयश्री कुलकर्णी अकार्यक्षम असल्याचा ठपका ठेवण्यात आला. गदारोळ वाढल्याने त्यांना सभागृह सोडावे लागले.
नगरसेवकांनी पळविलेल्या ९ कोटी रुपयांच्या धनादेशाचे प्रकरण ‘सामंजस्याने’ चर्चेतून दूर ठेवले गेले. सभेत नगरसेवकांनी आरोग्य विभागातील समस्या मांडल्या. जोखमीच्या भागात २९ शिबिरे घेऊन १०० हून अधिक रुग्णांची तपासणी केल्याचा दावा करण्यात येत आहे. तथापि, स्वच्छता आणि धूर फवारणीवरून सर्वसाधारण सभा गाजली.