तज्ज्ञ डॉक्टरांची निम्याहून अधिक रिक्त पदे

रायगड जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणा सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे आजारी पडली आहे. जिल्ह्य़ातील बहुतांश सर्व रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची ७५ टक्क्य़ांहून अधिक पदे सध्या रिक्त आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी खासगी रुग्णालये अथवा मुंबई, पुण्यातील शासकीय रुग्णालयांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली जात आहे.

मुंबई, पुण्याच्या जवळ असूनही जिल्ह्य़ात वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा आहे. जिल्हा रुग्णालयाची परिस्थिती फारशी चांगली नाही. रुग्णालयात वर्ग १ ची १९ पदे मंजूर आहेत. यापैकी ७५ टक्के पदे रिक्त आहेत. तर तर वर्ग २ साठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३० पदे मंजूर आहेत. यातील ६० टक्के पदे सध्या रिक्त आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बालरोग तज्ज्ञ, निवासी वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोगतज्ज्ञ, मनोविकृतीतज्ज्ञ, क्ष-किरणतज्ज्ञ, भिषक(फिजिशिअन), क्षयरोगतज्ज्ञ, कान-नाक-घसातज्ज्ञ, दंतचिकि त्सक यासारखे तज्ज्ञ डॉक्टर रुग्णालयात उपलब्ध नाहीत, त्यामुळे रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळू शकत नाही. तर दुर्धर आजारांवरील शस्त्रक्रियादेखील होऊ  शकत नाही.

त्यामुळे जिल्ह्य़ातील कानाकोपऱ्यांतून उपचारासाठी अलिबागला येणाऱ्या रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. दुर्धर आजारांसाठी रुग्णांना खासगी रुग्णालय आणि मुंबई, पुण्यातील शासकीय रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो आहे. मात्र यासाठी वेळ आणि पैसा खर्ची पडत आहेत. दुर्दैवाने कुठल्याही लोकप्रतिनिधीला या संवेदनशील प्रश्नाकडे लक्ष देण्यात रस असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य विभागातील रिक्त पदांचा प्रश्न तसाच कायम राहिला आहे.

जिल्ह्य़ात १ जिल्हा रुग्णालय, ५ उपजिल्हा रुग्णालय आणि ८ ग्रामीण रुग्णालये कार्यरत आहेत. या रुग्णालयांसाठी ९६१ पदे मंजूर आहेत. यातील ६३६ पदे भरलेली आहेत. तर ३२५ पदे रिक्त आहेत. भरलेल्या पदांपैकी ३० जण असे आहेत. जे नियुक्तीपासून गैरहजर आहेत. जिल्हा रुग्णालयासाठी ४३३ मंजूर पदे आहेत यापैकी २६० भरलेली आहेत. तर १७३ पदे रिक्त आहेत. चौक, म्हसळा, रोहा येथील ग्रामीण रुग्णालयात एकही वैद्यकीय अधिकारी कार्यरत नाही, तर पोलादपूर, मुरुड आणि कशेळे येथे एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. ही परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील सर्वच शासकीय रुग्णालयांची आरोग्य व्यवस्था डॉक्टरांअभावी आजारी पडली आहे. दुर्धर आजारावंरील उपचारांसाठी रुग्णांना मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे तेथील आरोग्य व्यवस्थेवरही ताण पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्य़ातील सर्व रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरली जावीत, अशी मागणी केली जात आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांबाबत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. वेळोवेळी त्याबाबत पत्रव्यवहार केला जात आहे. लवकरच ही पदे भरली जातील. तोवर उपलब्ध असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने चांगली रुग्णसेवा देण्याचा आमचा प्रयत्न  सुरू आहे. – डॉ. अजित गवळी. जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड</strong>