औषध कंपन्यांकडून मिळणारी सॅम्पल औषधे डॉक्टर रुग्णांच्या माथी मारून त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा बिल वसूल करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याच प्रकरणात येथील श्वेता हॉस्पिटलवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांनी छापा मारून मोठय़ा प्रमाणात औषध साठा जप्त केला आहे. या कारवाईने डॉक्टरांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
औद्योगिकदृष्टय़ा प्रगत या जिल्ह्यात प्रदूषण व दूषित पाण्यामुळे लोकांना हृदयरोगापासून तर कॅन्सर, टी.बी., त्वचारोग, श्वसन, केस गळती, सिकलसेल यासह अनेक आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील डॉक्टरांच्या दवाखान्यात रुग्णांची कायम गर्दी बघायला मिळते. त्यातूनच शहरात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झाले आहेत. आज शहरात सहा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स असून सुमारे १०० डॉक्टरांची हॉस्पिटल्स, नर्सिग होम व छोटे- मोठे दवाखाने आहेत. या सर्व डॉक्टरांना औषध कंपन्यांकडून सॅम्पल औषधे दिली जातात. मात्र, ही सॅम्पल औषधे डॉक्टर रुग्णांना देऊन त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणात बिल वसूल करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केवळ एकाच दवाखान्यात हा प्रकार चालतो अशातला भाग नाही, तर बहुतांश डॉक्टर्स हे विविध औषध कंपन्यांकडून मिळणारी औषधे हॉस्पिटलमधील रुग्णांना देतात व त्याचे बिल त्यांच्याकडून वसूल करतात. वैद्यकीय नियमानुसार सॅम्पल औषधांचे बिल वसूल करता येत नाही. मात्र, हा प्रकार येथे सर्रास सुरू असून यासंदर्भातील तक्रारी अन्न व औषध विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत.
त्याच आधारावर अन्न व औषध विभागाने आता डॉक्टरांविरुद्ध कारवाईला सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेसमोर हवेली कॉम्प्लेक्सच्या मागे श्वेता हॉस्पिटलची भव्य इमारत आहे. शहरातील चार ते पाच प्रतिष्ठीत डॉक्टरांनी एकत्र येऊन हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केले आहे. यात मोठय़ा प्रमाणात औषध साठा असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाल्यावर या विभागाच्या पथकाने या हॉस्पिटलवर छापा मारून मोठय़ा प्रमाणात औषध साठा जप्त केला आहे. ही कारवाई औषध निरीक्षक गोतमारे यांनी केल्याची माहिती आहे.
दरम्यान, या छाप्यात नेमका किती औषध साठा सापडला, याची माहिती जाणून घेण्यासाठी या विभागाचे आयुक्त जावडेकर यांच्याशी संपर्क साधला असता, छामा मारून औषधी जप्त केल्याची माहिती दिली. नेमका किती औषध साठा जप्त केला, असे विचारल्यावर ते म्हणाले, ते आताच सांगता येणार नाही. तीन ते चार दिवसानंतर सविस्तर माहिती देऊ. चंद्रपूर कार्यालयाचा अतिरिक्त कारभार आपल्याकडे असून नेमके या कारवाईत काय काय मिळाले, हेही सांगता येणार नाही. काही डॉक्टरांची तपासणी करण्यात आली, अशीही माहिती दिली. या कारवाईत जप्त केलेली औषधी मुंबईत तपासणीसाठी पाठविण्यात आलेली आहे. याचा अहवाल एक महिन्यानंतर मिळणार आहे. दरम्यान, या कारवाईमुळे डॉक्टरांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात श्वेता हॉस्पिटलचे डॉ.सतीश तातावार यांचे भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता ते संपर्ककक्षेच्या बाहेर असल्याचा संदेश आला, तर हॉस्पिटलच्या दूरध्वनीवर संपर्क केला असता डॉ. तातावार बाहेरगावी गेले आहेत. १६ फेब्रुवारीनंतर संपर्क साधा, असे सांगण्यात आले.