हृदयविकार, उच्च रक्तदाब, थॉयरॉइड यांसारख्या आजारामध्ये आयुष्यभर औषधे घ्यावी लागणार, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. खरे तर औषधे ही औषधांसारखीच वापरात आणायची असतात, ती आयुष्यभर घेण्यासाठी नसतात याचे भान रुग्ण आणि त्यांना सल्ला देणाऱ्या डॉक्टरांनाही राहात नाही. औषधांना वेगवेगळे पर्याय आपल्या आहारशास्त्रात असून त्याचा उपयोग केल्यास रोगमुक्ती मिळू शकते, असा दावा ख्यातकीर्त वैद्य प. य. खडीवाले यांनी येथे केला.
ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये वाचकांच्या भरगच्च उपस्थितीत ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या पाककृती संग्रहाचे प्रकाशन खास ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि पनवेलकर वाचकांसाठी करण्यात आले. या वेळी वैद्य खडीवाले यांनी वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांना थेट उत्तरे देत आहार, आरोग्य विषयाच्या शंकांचे निरसन केले. ‘साप्ताहिक लोकप्रभा’चे कार्यकारी संपादक विनायक परब यांनी वाचकांच्या वतीने खडीवाले यांना प्रश्न विचारले. या वेळी ‘रामबंधू’चे संचालक आनंद राठी, व्यवस्थापक जगदीश गुप्ता, ‘तन्वी हर्बल’च्या डॉ. जान्हवी पुष्कराज धामणकर, डॉ. रुचा प्रतीक पै आदी मान्यवर उपस्थित होते. पॉवर्डबाय ‘आयुशक्ती’ असलेल्या या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘विम’ होते. ‘तन्वी हर्बल प्रॉडक्ट’ हे सहप्रायोजक तर ‘रामबंधू’ हे टेस्ट प्रायोजक होते. वाचकांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे देत वाचकांशी दिलखुलास संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून खडीवाले यांनी साधला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच खडीवाले यांनी ‘चहा माहात्म्य’ वर्णन केले. आरोग्यदायी आणि काटकसरीचा चहा प्रत्येक घरामध्ये बनला पाहिजे. चहा कमी साखर व दुधाचा असावा तर काटकसरीचा चहा लिंबू, मीठ घालून प्यावा, असे खडीवाले म्हणाले.

हे करा, हे टाळा..

’वेलदोडे, दालचिनी, तमालपत्र, पिंपरी, जिरे, पुदिना अशासारख्या सुगंध असलेल्या मसाल्यांचा वापर करताना गरम पाण्यामध्ये त्यांचा उपयोग करावा. शिवाय शक्य असल्यास त्याची भुकटी करून उपयोग करावा.
’तोंड येत असलेल्यांनी आणि बारीक शरीरयष्टीच्या माणसांनी लिंबू टाळावे. पाणी आणि मिठाच्या अतिसेवनाने शरीराला सूज, शरीरातील कोलेस्टेरॉॅलचे प्रमाण वाढते.
’खाज येणाऱ्या व्यक्तींनी अंडय़ातील पिवळा बलक काढून पांढरा भाग खावा. गहू, भात मधुमेह वाढवतो तर ज्वारी कमी करते.
’बेलाच्या पानांचा काढा मधुमेह, रक्तदाब यावर उपयुक्त ठरत असतो. जांभळामुळे मधुमेह वाढतो तर त्यातील बियांमधील गरामुळे तो कमी होऊ शकतो.
’मधुमेह असताना गव्हाच्या पिठाचा उपयोग करताना त्यामध्ये मेथीचे पीठ मिसळावे. मधुमेहामध्ये आंबा, अननस, चिकू, केळी, फणस अशी फळे खाऊ नये तर सफरचंद, पांढरे खरबूज, ताडगोळे, पोफळी, संत्र, बोरे, करवंदे अशी फळे खावी.
’कोरफड हे अत्यंत गुणकारी वनस्पती असून मासिक पाळी नियमित यावी यासाठी हे उपयुक्त आहे. कोरफडीचा गर खाल्ल्याने सर्दी, पडसे दूर होते. केसांच्या समस्येवरही कोरफड लावून मात करता येते. कोंडा असलेल्या व्यक्तींनी तेल लावू नये. यकृताचे कार्यही सुधारते.
’थायरॉइडवर बिब्बा, गुगुळसारखे वनस्पती उपयुक्त ठरता. हिरडाचा उपयोग वायूवर नियंत्रण राखण्यासाठी उपयुक्त ठरतो.
’कॅल्शियमच्या गोळ्या खाणे शुद्ध वेडेपणा असून दूध, पालेभाज्या, कडधान्ये यांच्या मदतीने त्यावर मात करता येते.