एचआयव्हीच्या ‘सेकंड लाइन’ रुग्णांना दिल्या जाणाऱ्या ‘अ‍ॅटाझानाविर-रिटोनाविर’ या औषधांचा गेल्या महिनाभरापासून निर्माण झालेला तुटवडा अजूनही सुरूच आहे. सध्या या विशिष्ट ‘काँबिनेशन’च्या गोळ्यांचा पंधरा दिवसांचा साठा ‘महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी’कडे (एमसॅक्स) असून संस्थेने ‘नॅको’कडे (नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन) औषधांची मागणी केली आहे. सेकंड लाइन रुग्णांसाठीच वापरल्या जाणाऱ्या ‘लोपिनाविर- रिटोनाविर’ या औषधांचा मात्र ५ महिने पुरेल एवढा साठा सध्या शिल्लक आहे.
ससून सवरेपचार रुग्णालयात चालवल्या जाणाऱ्या एआरटी केंद्रात बुधवारी रुग्णांना पुरेशा गोळ्या मिळत असल्याचे चित्र होते. परंतु गेल्या दीड महिन्यांत अनेक सेकंड लाइन रुग्णांना २ ते ३ वेळा कमी दिवसांच्या गोळ्या घेऊन परत जावे लागले असल्यामुळे गोळ्यांची अनिश्चितता कायम असल्याचीच भावना रुग्णांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली. या केंद्रावर पडणारा बोजाही मोठा असून पुणे जिल्ह्य़ासह सोलापूर, नगर, बीड, लातूर आणि नाशिकचेही रुग्ण आल्याचे बघायला मिळाले.
टेंभुर्णीच्या एका रुग्णाने सांगितले, ‘मला दोन वेळा केवळ २ ते ४ दिवसांच्या गोळ्या देऊन परत पाठवण्यात आले होते. प्रत्येक वेळचा येण्याजाण्याचा खर्च किमान चारशे रुपये येतो.’ बार्शीच्या एका रुग्णानेही मे महिन्यात दोनदा केवळ दोन दिवसांच्या गोळ्या घेऊन माघारी जावे लागल्याचे सांगितले. नगरचा एक रुग्ण म्हणाला, ‘आम्ही गोळ्या घ्यायच्या दिवशी सकाळी ९ वाजल्यापासून ससूनच्या केंद्रात बसून राहतो. गर्दी असल्यावर ५ ते ६ तास थांबावे लागते. बसायला पुरेशी जागा तसेच स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याने अडचण होते.’
एचआयव्हीच्या रुग्णांना आजाराचे निदान झाल्यानंतर सुरुवातीला दिलेली औषधे त्यांना चालत नसतील, तर औषधे बदलली जातात, या औषध बदलाला ‘सेकंड लाइन थेरपी’ म्हटले जाते.

‘अ‍ॅटाझानाविर- रिटोनाविर या औषधाचा १५ दिवसांचा साठा शिल्लक आहे. गेल्या महिन्यात या गोळ्यांच्या उपलब्धतेची समस्या निर्माण झाली होती. यातील केवळ ‘रिटोनाविर’ गोळ्यांचा साठा पावणेपाच महिने पुरेल एवढा आहे, पण ‘अ‍ॅटाझानाविर’चा साठा कमी असून केवळ या गोळ्या मिळाल्या तरी समस्या सुटेल. ‘नॅको’कडे औषधांसाठी पाठपुरावा सुरू आहे. येत्या ८-१० दिवसांत आणखी साठा येण्याची अपेक्षा आहे. दहा दिवसांपूर्वी ‘नॅको’ने या काँबिनेशनच्या ४८ हजार गोळ्या उपलब्ध करून दिल्या होत्या. ‘फस्ट लाइन’ औषधांचा राज्यात तुटवडा नाही.’
कुशालसिंह परदेशी, प्रकल्प संचालक, ‘एमसॅक्स’

सेकंड लाइनसाठीचे केंद्र रुग्णसंख्या
जेजे रुग्णालय- मुंबई १६८८
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय- पुणे १२९६
औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ४७९
नागपूर ३६२
सांगली ४३२
याशिवाय लहान मुलांसाठीचे सायनमधील केंद्र ७७ बालरुग्ण

एचआयव्हीसंबंधीची आकडेवारी
’राज्यात एचआयव्हीचे एकूण रुग्ण- १ लाख ६० हजार
’त्यापैकी ४,३३३ रुग्ण ‘सेकंड लाइन’ औषधांचे
’एक महिन्यांच्या सेकंड लाइन गोळ्यांची अंदाजे किंमत- ६ हजार रुपये
’सेकंड लाइन औषधे पुरवणारी प्रमुख एआरटी केंद्रे- ५