सावंतवाडी शहरात दुचाकीचा अपघात घडल्याने मांस घेऊन जाणाऱ्या इसमाचा पोलीस ठाण्यात पर्दाफाश करताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. मात्र पोलीस ठाण्यात सहा तास शेकडो कार्यकर्त्यांनी हे गोमांस असल्याचे ठासून सांगितल्यावर तक्रार दाखल करण्यात आली. सावंतवाडी शहरात सकाळीच टीव्हीएस वेगो व करिश्मा मोटारसायकलमध्ये अपघात घडला. या अपघातात तिघेजण जखमी झाले. त्यात वेगो टीव्हीएस चालक जमीर महमद जामदार हाही जखमी झाला होता. त्याच्या गाडीत सुमारे १९ किलो मांस आढळल्याने सर्वच चक्रावून गेले. सावंतवाडी पोलीस ठाण्याचे हवालदार पी. एस. माने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मांस गाडीसह पोलीस ठाण्यात नेले. पोलीस गोमांस असूनही संबंधित इसमास पाठीशी घालत असल्याच्या संशयाने शेकडो कार्यकर्ते पोलीस ठाण्यात दाखल झाले. या मांसाबाबत पोलिसांनी पंचनाम्यात नोंद केली, पण अपघाताव्यतिरिक्त गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दर्शविल्याने वनखात्याच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. वन्यप्राण्याचे मांस असल्याचे प्रयोगशाळेतून मान्य झाल्यास पुढील कारवाई करण्याचे वनखात्याने मान्य करून हात झटकले. पशुवैद्यकीय साहाय्यक आयुक्त एकनाथ बकेतवार व पशुधन अधिकारी विद्यानंद देसाई यांनी पोलीस ठाण्यात येऊन मांस प्रयोगशाळेत पाठविण्याचे सोपस्कार पूर्ण केले. सुरुवातीला पोलीस निरीक्षक रणजीत देसाई व साहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला, पण तब्बल सहा तासांनी गुन्हा नोंदवून घेण्याची तयारी दर्शविली. काँग्रेस तालुका अध्यक्ष संतू परब, शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ, मंदार नार्वेकर, सभापती प्रमोद सावंत, देवा माने, शब्बीर मणीयार यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धडक दिली. अखेर सुनील पेडणेकर यांनी याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी महाराष्ट्र  पशुसंवर्धन कायदा १९९५चे सुधारित कलम ५(सी)९ प्रमाणे गुन्हा दाखल करून जमीर महमद जामदार याला अटक केली. पुणा येथील प्रयोगशाळेत नमुने तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. हे मांस आजरा येथून आपण विकतो असे संशयिताने मान्य केल्याचे पोलिसांना सांगितले. यामुळे गोमांस गुन्हा दाखल झाला.