उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांच्यात एकमेकांच्या सहकार्यासाठी चर्चा करण्यात आली. शुक्रवारी रात्री उशिरा या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोघे एकमेकांना भेटले. या दोघांमध्ये मनोमीलन होण्याची ही तिसरी वेळ आहे. खासदार उदयनराजे भोसले हे त्यांचा चुलत भाऊ शिवेंद्रसिंह राजे यांना मदत करणार आहे. या दोघांनी एकत्र येऊन चर्चा करावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत होती. त्यानुसार या दोघानाही सावंत नावाच्या कार्यकर्त्याच्या कार्यालयात बसून चर्चा केली. सुनील काटकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले या दोन कार्यकर्त्यांनी ही भेट घडवून आणली.

उदयनराजेंना भाजपा प्रवेशासाठी राजीनामा द्यावा लागल्यास होणारी लोकसभेची पोटनिवडणूक या संदर्भात चर्चा झाली. दोघांचेही भाजपात नव्याने राजकारण सुरू होणार आहे. त्यामुळे दोघे एकत्र राहिले तरच त्यांचे भाजपामध्ये महत्व राहणार आहे आणि निवडणूकही सोपी जाणार आहे. उदयनराजेनीही भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असल्याने पोटनिवडणूक झाल्यास त्यांनाही पुन्हा एकदा शिवेंद्रसिंहराजेंची मदत लागणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सातारा जावलीतून उदयनराजेंना सर्वाधिक मताधिक्‍क्‍य शिवेंद्रसिंहराजेंनी मिळवून दिले होते. आता त्याची परतफेड या निवडणुकीत उदयनराजे भोसलेनां करावी लागणार आहे. शिवेंद्रसिंहराजे उदयनराजे मदत करणार असे कितीही सांगत असले तरी याबाबत शिवेंद्रसिंहराजेंनाच मदतीची खात्री नाही,याचीही बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.