राज्यातील सर्व वीज ग्राहकांच्या देयकात सरासरी २५ टक्के दरवाढ लागू करणाऱ्या परिपत्रकाप्रमाणे महावितरणने दरमहा अंदाजे ८०० कोटी रुपये जादा आकारणी सुरू केली आहे. यंत्रमागधारक व कृषीपंप ग्राहक यांना वाढीव संपूर्ण रक्कम भरावी लागणार असल्याने त्यांची देयके दीडपट ते दुप्पट होणार आहेत. या दरवाढीच्या विरोधात सामूहिक चळवळीचा कृती कार्यक्रम ठरविण्यासाठी राज्यातील सर्व वीज ग्राहक संघटना, औद्योगिक, शेतकरी व यंत्रमागधारक संघटनांची व्यापक बैठक २४ सप्टेंबर रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे आणि प्रा. शाम पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ५ सप्टेंबर रोजी दिलेल्या निकालाचा आधार घेऊन महावितरणने अतिरिक्त वीज आकारणी व अतिरिक्त इंधन समायोजन आकारणीचे परिपत्रक ७ सप्टेंबर रोजी जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व उच्चदाब उद्योगांना प्रति युनिट १५० ते १६० पैसे जादा आकारणीसह देयके लागू करण्यात आली आहेत. त्यामुळे उद्योग व औद्योगिक संघटनांमध्ये अस्वस्थता व असंतोष निर्माण झाला असतानाच घरगुती, व्यापारी, शेतकरी व यंत्रमागधारक या घटकांनाही ही दरवाढ लागू होणार आहे.