लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची आज सांगता होताना, सातारा लोकसभा मतदारसंघातील आरोप, प्रत्यारोपांच्या तोफाही विसावल्या असून, आता मतदानाची तयारी जोर धरून आहे. मुख्यमंत्र्यांच्या होमपीचवरील, तसेच पवार पॉवरच्या बालेकिल्ल्यातील सातारा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार व विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्यासमोर तब्बल १७ उमेदवार असून, या साऱ्यांनी उदयनराजेंनाच लक्ष्य केल्याने राजे गटासह काँग्रेस आघाडीने ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. आघाडीच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत उच्चांकी मताधिक्याचा निर्धार केल्याने काँग्रेस आघाडी नेत्यांचा हा दावा किती दमाचा हे मतमोजणीअंतीच समोर येणार आहे.
आप, महायुतीतर्फे रिपाइं, बसप या पक्षांच्या उमेदवारांबरोबरच अपक्षांचाही या खेपेला भरणा राहिल्याने आणि साऱ्यांनी उमेद दाखवत उदयनराजेंना बिनदिक्कत लक्ष्य केल्याने, जनतेचे जिव्हाळय़ाचे प्रश्न ऐरणीवरच राहताना, उदयनराजे का नकोत आणि मी कसा योग्य यावरच खऱ्या अर्थाने ऊहापोह झाला. उदयनराजेंवर सरळसोट टीकाटिप्पणी झाल्याने राजे गटाच्या दबदब्याला खऱ्या अर्थाने आव्हान मिळाल्याचे मानले जात आहे. आपचे राजेंद्र चोरगे, पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे व सध्याचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव, जिजामाता उद्योग समूहाच्या झुंजार नेत्या अ‍ॅड. वर्षां माडगूळकर या प्रमुख उमेदवारांनी उदयनराजे भोसलेंवर सरळसोट आरोप करून प्रचाराची रंगत वाढवली. आघाडी शासनावरील संताप, उदयनराजेंचे कामचलाऊ धोरण आणि मोदी लाटेची चर्चा यामुळे आघाडीच्या बालेकिल्ल्यात काहीसे परिवर्तनाचे वारे वाहत असलेतरी मुख्यमंत्र्यांचे घरचे मैदान, तसेच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला यामुळे निवडणूक सत्तेच्या जोरावर आणि लोकप्रतिनिधींच्या मतांच्या गठ्ठय़ांवर जरब असल्याने उदयनराजेंच्या पारडय़ात मोजली जात आहे, मात्र संताप आणि नाराजीमुळे प्रथमच प्रस्थापितांना स्थानिक नेत्यांची दारे पुजावी लागली, तर जवळपास प्रत्येक उमेदवाराने उदयनराजेंनाच लक्ष्य केल्याने आणि मोदी लाटेची चर्चा असल्याने याचा एकंदर मतांमध्ये किती बदल होतो याचा फैसला निवडणूक निकालावरून स्पष्ट होणार आहे.