तेरणा आणि तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्यांकडे थकीत ३०० कोटी रुपयांची वसुली व शासनाकडील थकहमी या विषयावर सोमवारी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी रविवारी सांगितले.
जिल्हय़ात दुष्काळ पडल्याने सलग चौथ्या वर्षी शेतकरी अडचणीत सापडला आहे. आíथक नाडी समजली जाणारी जिल्हा बँक अडचणीत आहे. ठेवीदारांच्या हक्काचे पसेही त्यांना मिळत नाही. यावर तोडगा काढण्यासाठी आमदार पाटील यांनी विशेष बैठकीची मागणी केली होती. केंद्र सरकारने आíथक डबघाईस आलेल्या व परवाना न मिळालेल्या २९ बँकांना मदतीचा हात देऊन बळ दिले आहे. राज्यातील ६ जिल्हा बँकेचा यात समावेश होता. त्यापकी जालना, धुळे-नंदूरबार, वर्धा, बुलढाणा व नागपूर या पाच बँकांना शासनाने मदत जाहीर केली आहे. स्वबळावर कलम ११च्या जाचक अटीमधून बाहेर पडून बँक परवाना मिळविणाऱ्या उस्मानाबाद जिल्हा बँकेला मात्र मदत मिळालेली नाही. ती मिळावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.
 जिल्हा परिषदेचे सर्व आíथक व्यवहार बँकेमधून पूर्ववत सुरू व्हावेत, सक्षम कार्यकारी संचालकाची नियुक्ती करावी, वैद्यनाथन पॅकेज, शासकीय देणी तातडीने मिळावी या मागणीसह तेरणा आणि तुळजाभवानी साखर कारखान्यांकडे रक्कम वसूल कशी करावी, याबाबतची चर्चा सोमवारच्या बठकीत होणार आहे.