राष्ट्रवादी कॉंग्रेस मित्रपक्ष असतांनाही या पक्षाच्या जिल्हा नेत्यांशी वैर असणाऱ्या खासदार दत्ता मेघेंना या लोकसभा निवडणुकीत पुत्र सागरसाठी या गटाची मदत घेण्याचे मोठे आव्हान उभे असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादीचे जिल्ह्य़ाचे सर्वेसर्वा व विदर्भ सिंचन मंडळाचे उपाध्यक्ष आमदार प्रा.सुरेश देशमुख यांची या निवडणुकीतील भूमिका सर्वात महत्वाची ठरणार आहे. त्यांचे व खासदार दत्ता मेघे गटाचे पाच वर्षांत उभे राजकीय वैर आहे. त्याला गतवेळच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीची पाश्र्वभूमी आहे. स्वत:च्या निवडणुकीत त्यावेळी देशमुख गटाचे सहकार्य घेणाऱ्या मेघेंनी विधानसभा निवडणुकीत देशमुखांना कैचीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतो. त्यानंतर या दोन्ही गटात उभा दावा केला गेला. हे दोन्ही आजी-माजी पवार अनुयायी आजही पवारांचे बोट धरूनच आहेत. राष्ट्रवादी सोडतांना अजित पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या मेघेंचा पक्षाध्यक्ष शरद पवारांची स्नेहच राहिला, तर अजित पवारांना नेतृत्व बहाल करणाऱ्या आमदार देशमुखांचे ज्येष्ठ पवारांशी बेताचेच संबंध राहिले.
या पाश्र्वभूमीवर सागर मेघेंसाठी देशमुखांचा सहकार गट प्रचार करणार काय, हा लाखमोलाचा प्रश्न ठरत आहे. जिल्ह्य़ात एका तासाच्या हाकेवर एक लाखाची सभा हा सहकार गटच घेऊ शकतो, अशी जाहीर प्रशस्ती कधीकाळी देणाऱ्या मेघेंना त्यामुळेच जुळवून घेण्याची कसरत करावी लागणार आहे. जिल्हाभर विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे जाळे असणाऱ्या सहकार गटाला जिल्हा बॅंकेच्या आपत्तीने घायाळ केले आहे. बॅंकेला मदत मिळण्यात या कांॅग्रेसी नेत्यांनीच खोडा घातल्याचा आरोप सहकार गटाकडून झाला. उमेदवार सागर मेघे यांचे मेहुणे असलेले पालकमंत्री राजेंद्र मुळक यांच्या महाराष्ट्र दिनाच्या व अन्य कार्यक्रमांवर बहिष्कार टाकून सहकार गटाने आपला संताप निदर्शनास आणला.
मात्र, निवडणुकीत ही बाब अंगाशी येऊ शकण्याची शक्यता हेरून पालकमंत्री मुळकांनी आमदार देशमुखांच्या उपस्थितीत जिल्हा बॅंकेच्या संचालकांचे राजीनामे घेऊन शासनाच्या संभाव्य मदतीची गुगली टाकली. मात्र, हे एवढय़ावरच भागणारे नाही. मेघे कुटुंबाच्या राजकीय वारसदारासाठी खासदार मेघे हे सर्व ते प्रयत्न करतीलच, पण मेघे कुटुंबाच्या वारसदारास सहकार गटाचे वारसदार असलेले समीर देशमुख यांचाही अडथळा आहेच. मेघे कुटुंबास इंगा दाखविण्याचा हेतू ठेवून समीर देशमुखांनी भाजपचे नेते नितीन गडकरी यांना दिल्लीत भेटून उमेदवारीची गळ घातली होती. हा एकप्रकारे दबावतंत्राचाच भाग होता. मेघेंच्या गतवेळच्या निवडणुकीत प्रचारासाठी अडून बसलेल्या समीर देशमुखांची समजूत सागर मेघेंनीच घालून त्यांना प्रचारात आणले होते. आता स्वत:च उमेदवार असणाऱ्या सागर मेघेंना परत सामोपचाराचा डाव मांडावा लागणार.
जिल्हा बॅंक व अन्य बाबी निमित्यमात्र असल्या तरी सागर मेघेंचे पदार्पण हे समीर देशमुखांना धोक्याची घंटा वाटते. जिल्ह्य़ातील प्रत्येक गावात किमान पोस्टाचा डबा व आमचा कार्यकर्ता हमखास आढळतो, असे सांगणाऱ्या सहकार गटाला सागर मेघेंची उमेदवारी गटाला खिंडार पाडणारी वाटते. त्यामुळे एकवेळ भाजप उमेदवार चालेल, पण मेघे नको, असा या गटातील काहींचा सूर आहे. नेहमी समन्वयाची भूमिका घेणाऱ्या वडिलांविरोधात समीर देशमुख मेघेंबाबतचा निर्णय घेणार काय, हा सुध्दा एक उत्सुकतेचा भाग ठरला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत आपल्याला आमदार देशमुखांचे निश्चित सहकार्य मिळेल, असे खासदार मेघे यांनी छातीठोकपणे सांगितले होते. त्यांचे व्यक्तिगत कौशल्य हे एक कारण असले तरी शरद पवारांचे निर्देश हेच त्यामागचे खरे कारण आहे. मेघे अभिमत विद्यापीठाच्या कार्यक्रमात सागर मेघेंचे गुणगान करतांना शरद पवारांनी त्याला राजकारणात चांगला वाव असल्याचे नमूद केले होते. उमेदवारी व पुढे प्रचारातही मदत करण्याची हमी पवारांनी त्याच कार्यक्रमात आमदार देशमुखांच्या साक्षीने दिली होती. आघाडीधर्म म्हणून पवार वर्धेत येतीलच, पण सहकार गटाला मनापासून ते सागर मेघेंच्या प्रचारात आणू शकतील काय, हे पुढेच दिसेल. मात्र, सहकार गटाचे येनकेनप्रकारे सहकार्य मिळविण्याचे मेघे पितापुत्राचे प्रयत्न कितपत फ लदायी ठरतात, हे आज कुणीच सांगू शकत नाही.