मानवी मलमूत्र साफ करणाऱ्या पंढरपुरातील मेहतर समाजाच्या सफाई कामगारांना राहती निवासस्थाने मालकी हक्काने करून देण्याची मागणी गेल्या ३० वर्षांपासून सातत्याने मांडली जात असताना त्याबाबत ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे यंदा आषाढी यात्रेच्या तोंडावर मेहतर समाजाने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. येत्या १० जुलैपासून आषाढी यात्रेच्या काळात बेमुदत काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनामुळे यात्रेच्या काळात स्वच्छतेचा प्रश्न बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रश्नावर अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या पंढरपूर शाखेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले आहे तसेच जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांचीही भेट घेऊन प्रलंबित प्रश्नावर आंदोलनाचा इशारा दिला आहे. मूळ गुजरातचा असलेला मेहतर समाज पंढरपुरात गेल्या १२५ वर्षांपासून राहून मानवी मलमूत्र साफ करण्याची सेवा करीत आहे. आषाढी व कार्तिकी यात्रेच्या काळात तर मेहतर समाजाच्या स्वच्छता कामगारांकडून मानवी मलमूत्र साफ करण्याचे काम रात्रंदिवस केले जाते. विशेषत: पंढरपूरवासीयांचे आरोग्यच नव्हे, तर भीमा नदीतीरी असलेल्या सर्व गावांचे सार्वजनिक आरोग्य सांभाळण्याचे काम हा समाज करतो. चंद्रभागेचे वाळवंट व पटांगणावरील मैला हाताने साफ करण्याचे काम हाच समाज करीत असतो.
पंढरपुरात मेहतर समाजाच्या कुटुंबांची संख्या २१० एवढी आहे. या समाजाला राहती निवासस्थाने मालकी हक्काने मिळावीत, अशी मागणी गेल्या ३० वर्षांपासून सातत्याने केली जात असताना त्या पुष्टय़र्थ १९९३ साली पंढरपूर नगरपालिकेने ठराव संमत करून शासनाकडे पाठविला होता. मात्र नंतर ही निवासस्थाने श्रमसाफल्य योजनेतून बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णयच मेहतर समाजावर अन्याय करणारा असल्याचा आक्षेप घेतला जात आहे. मेहतर समाजाची घरे पाडून त्याच ठिकाणी श्रमसाफल्य योजनेतून घरकुले बांधताना त्यात १९२ घरकुलांपैकी केवळ ५२ घरकुले मेहतर समाजातील सफाई कामगारांना मिळणार आहेत. उर्वरित कुटुंबे उघडय़ावर पडणार आहेत, असे सफाई मजदूर काँग्रेसच्या पंढरपूर शाखेचे अध्यक्ष अंबालाल दोडिया यांचे म्हणणे आहे. मेहतर समाजाला त्यांच्या हक्काची राहती निवासस्थाने त्यांच्या मालकी हक्काने करून द्यावीत व श्रमसाफल्य योजना अन्य पर्यायी जागेवर राबवावी, अशी दोडिया यांची मागणी आहे.
गेल्या वर्षी यात्रेच्या तोंडावर याच प्रश्नावर मेहतर समाजाने तीन दिवस काम बंद आंदोलन केले होते. त्या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत: मेहतर समाजाच्या शिष्टमंडळाबरोबर वाटाघाटी करून सफाई कामगारांच्या निवाऱ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लागण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी हा प्रश्न मांडला होता. तदपश्चात अलीकडे हिवाळी अधिवेशनात आमदार दीपक साळुंखे यांनीही या प्रश्नावर लक्षवेधी मांडली होती. परंतु, शासनाने केवळ आश्वासन देऊन तोंडाला पाने पुसली. आता मात्र आम्ही आश्वासनाला भुलणार नाही. जोपर्यंत निवाऱ्याचा प्रश्न निकालात निघत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही, असा इशाराही दोडिया यांनी दिला आहे.