मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीत आदिवासी आणि वनविभाग- पोलीस कर्मचारी यांच्यात मंगळवारी दुपारी सशस्त्र संघर्ष झाला असून यात ४० जण जखमी झाले आहेत. आदिवासी ग्रामस्थांनी वन कर्मचाऱ्यांवर केलेल्या हल्ल्यात ३० कर्मचारी जखमी झाले. तर पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात १० ग्रामस्थ जखमी झाले आहेत. मेळघाटमध्ये पहिल्यांदाच स्थानिक आदिवासी आणि वनकर्मचाऱ्यांमध्ये असा हिंसक संघर्ष झाला असून या भागात आता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हा संघर्ष नेमका कशामुळे झाला याचा घेतलेला आढावा…

वादाचे कारण काय ?
मेळघाटातील आदिवासींचे अकोट येथे पुनर्वसन करण्यात आले होते. मात्र, पुनर्वसित गावांमध्ये सरकारने मूलभूत सुविधा पुरवण्यात दिरंगाई केल्याचे आदिवासी समाजाचे म्हणणे आहे. पाठपुरावा करुनही सुविधा मिळत नसल्याने पुनर्वसित आदिवासी पुन्हा मेळघाटातील मूळ गावी परतले होते. मेळघाटमधील अमोणा, बारुखेडा, धारगड, सोमठाणा बु., सोमठाणा खु., गुल्लरघाट, केलपाणी, नागरतास या जुन्या गावात पुनर्वसित आदिवासी १५ जानेवारीला परतले. याप्रकरणी ४५ आदिवासींवर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईमुळे आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली होती. तेव्हापासून या परिसराला वन विभाग व पोलीस विभागाचे पथक तैनात करण्यात आले होते. यामुळे परिसराला आधीच छावणीचे स्वरूप आले आहे.

मंगळवारी का झाला सशस्त्र संघर्ष
पुनर्वसित आदिवासींसोबत प्रशासनाची चर्चा सुरु होती. मात्र, आदिवासी आपल्या मागण्यांवर ठाम होते. मंगळवारी दुपारी पोलीस, एसआरपीएफ व वनविभागाचे कर्मचारी जंगलात ठाण मांडलेल्या आदिवासींना मेळघाट व्याघ्रप्रकल्पाबाहेर काढण्यासाठी तिथे गेले. यादरम्यान आदिवासी व पथकाचे अधिकारी यांच्यात शाब्दिक वाद झाला. यानंतर आदिवासी ग्रामस्थांनी दगड, धनुष्यबाण, गोफण, काठ्या व मिरची पावडरने वन विभाग आणि पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. आदिवासी ग्रामस्थांनी वनविभाग आणि पोलिसांच्या सुमारे १५ वाहनांची तोडफोड केली असून जंगलात अनेक ठिकाणी आगी लावण्यात आल्या आहेत.

हल्ल्यात ४० जखमी
शेकडो लोकांनी केलेल्या या हल्ल्यामुळे परिस्थिती बिघडली. सुरक्षा दलाच्या जवानांनीही प्रतिकार केला. या सशस्त्र संघर्षांत पोलीस आणि वनविभागाचे जवळपास ३० कर्मचारी आणि १० ते १५ आदिवासी जखमी झाले. जखमी कर्मचाऱ्यांना अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यापैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

परिसरात संचारबंदी लागू
गुल्लरघाट परिसरात तणावपूर्ण परिस्थिती असून, अमरावती येथील पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी पोहोचली आहे. पोलीस व वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत. या परिसरात सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

गेल्यावर्षीही झाला होता वाद
गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात अशाच पद्धतीने पुनर्वसित आदिवासी आपल्या मूळ गावी परतले होते. पण, त्यावेळी त्यांना बाहेर काढण्यात व्याघ्र प्रकल्प प्रशासनाला यश आले होते. यावेळी मात्र, आदिवासी गावकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. वनविभागाने आदिवासींना बाहेर काढण्यासाठी बळाचा वापर केल्याने हा संघर्ष उद्भवल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.