खासदार हीना गावित यांची धुळ्यामध्ये मराठा आंदोलकांनी गाडी फोडली आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जमलेल्या आंदोलकांनी गावित यांच्या गाडीच्या काचा फोडल्याची माहिती मिळत आहे. आंदोलकांचे म्हणणे ऐकण्यास लोकप्रतिनिधींनी नकार दिल्याने आंदोलक संतापले आणि त्यांनी हे हिंसक पाऊल उचलले. या प्रकरणात पोलिसांनी १५ ते २० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात पेटत असताना आंदोलक अनेक ठिकाणी आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

धुळ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आज धुळे, नंदुरबार येथील डीपीडीसीची बैठक होती. या बैठकीसाठी खासदार हीना गावित, आमदार कृणाल पाटील, जयकुमार रावल, सुभाष भामरे, अनिल गोटे आदी उपस्थित होते. बैठक सुरू होण्याआधीपासूनच मराठा आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसले होते. बैठक झाल्यानंतर सर्वप्रथम बाहेर आलेल्या खासदार गावित यांना आंदोलकांनी रोखले. त्यांनी आरक्षणाबाबत चर्चा करण्याची मागणी केली. मात्र गावित यांनी त्यास नकार दिल्याने आंदोलकांनी गावित यांची गाडी फोडली. बाहेरील परिस्थिती चिघळल्याने बैठकीसाठी आलेले आमदार दालनात अडकले आहेत. आंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची पुढची दिशा काय असावी हे निश्चित करण्यासाठी आज मराठा आरक्षण परिषदेने पुण्यात महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी मराठा समाजातील मान्यवर समन्वयक, संशोधक, तज्ञ, अभ्यासक तसेच खासदार उदयनराजे भोसले देखील उपस्थित आहेत. आज धुळ्यात खासदार सुभाष भामरे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. मात्र अचानक गावित यांची गाडी फोडल्याने या विषयाला हिंसक वळण लागले आहे. राज्यात भाजपाच्या नेत्यांच्या घरांसमोर जाऊन आंदोलन केले जात आहे.