भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक औरंगाबाद येथे उभारण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. शहरातील हॉटेल अमरप्रीतच्या समोरच्या बाजूस शासकीय दूध डेअरीला भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या जागेत हे स्मारक केले जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली असून मंत्रिमंडळासमोर तसा प्रस्ताव ठेवला जाईल, असे खडसे म्हणाले.
 शासनाच्या ६ एकर जागेपैकी २ एकर जागेत हे स्मारक उभे करण्यासाठी प्रारूप तयार केले जाणार आहे. त्याच्या सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली असल्याचे त्यांनी सांगितले. तीन महिन्यांत हा आराखडा तयार होणार असून तेथे एक उद्यानही व्हावे, असा प्रयत्न आहे. या उद्यानात गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा, त्यांनी वापरलेल्या वस्तू व पुस्तकांचे संग्रहालय, त्यांनी लिहिलेले लेख येथे ठेवले जाणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यावरील लघुपट दाखविण्यासाठी १०० आसनक्षमतेचे एम्पी थिएटरही उभारण्यात येणार आहे.