मुख्यमंत्र्यांनी राजीनामा नामंजूर केल्याची माहिती; काम करू देणार नसतील फायदा काय?
खास मुख्यमंत्र्यांच्या आग्रहखातर जलसंपदा विभागाच्या सल्लागारपदी नियुक्त झाल्यावर प्रशासनातील काही वरिष्ठांचा मला विरोध होता. मला कामकाज करता येऊ नये असेही पाहिले जात होते. या यंत्रणेला मी नको असल्याने मी राजीनामा दिला. या बाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असून त्यांनी हा राजीनामा नामंजूर केल्याची माहिती हि. ता. मेंढेगिरी यांनी येथे दिली.
जलसंपदा विभागाच्या सल्लागारपदाचा राजीनामा दिलेले मेंढेगिरी आज पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी या आपल्या गावी परतले. या वेळी पंढरपूरमध्ये ते बोलत होते. मेंढेगिरी म्हणाले की, जलसंपदा विभागाचा सचिव म्हणून ३१ मार्च २०१५ रोजी निवृत्त झालो. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागात बदल घडविण्यासाठी १ जानेवारी २०१६ रोजी जलसंपदा विभागाच्या सल्लागारपदी नियुक्त केले. मात्र काही दिवसातच या विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी नकोसा झालो होतो.
या विभागात सर्वच चोर नाहीत. जवळपास ८० टक्के लोक चांगले आहेत, असे मत मेंढेगिरी यांनी नोंदविले. मात्र माझ्या नवीन कामाच्या जबाबदारी निश्चित केल्या नाहीत. कोणते अधिकार आहेत, कोणते काम करावे याची माहिती मिळत नव्हती. महत्त्वाच्या निर्णयात सल्लागाराचे मत घेतले जात नसल्याची तक्रार मेंढेगिरी यांनी केली.
जलसंपदा विभागात काही चुका झाल्या आहेत, पण जे दोषी नाहीत त्यांनाही शिक्षा भोगावी लागत असल्याचे मेंढेगिरी म्हणाले. चौकशीचे भूत अनेकांच्या पाठीशी आहे. जे दोषी आहेत त्यांची चौकशी पूर्ण करून त्यांना शिक्षा द्यावी, पण असे होत नसल्याची खंत मेंढेगिरी यांनी व्यक्त केली. या बाबत या विभागाचे मंत्री गिरीश महाजन किवा मुख्यमंत्री यांना दोषी धरणार नाही. ज्या उद्देशाने मी हे काम स्वीकारले त्यात यश आले नाही. आपल्या राजीनाम्याबाबात मुख्यमंत्र्यांना कळवले असून त्यांनी माझा राजीनामा नामंजूर केला असल्याची माहिती मेंढेगिरी यांनी दिली. जर पुन्हा बोलावले तर जाणार का, असे विचारले असता या बाबत अजून विचार केला नाही. मात्र ज्या कामासाठी बोलाविले जाते ते कामच करू देणार नसेल तर या पुनर्नियुक्तीचाही काय फायदा होणार असे ते म्हणाले.

एसटीने प्रवास
जलसंपदा विभागातील घोटाळे सर्वश्रुत आहेत. या विभागात सचिव दर्जाच्या पदावर काम करीत असताना कोणतीही चौकशी किंवा भ्रष्टाचाराचा डाग न लागलेले असे निस्पृह अधिकारी म्हणून मेंढेगिरी यांची ओळख आहे. सल्लगारपदाचा राजीनामा दिल्यानंतर शुक्रवारी मेंढेगिरी पंढरपूर तालुक्यातील आपल्या जैनवाडी गावी चक्क एसटी बसमधून परतले.