News Flash

वाढत्या थंडीचा द्राक्ष बागायतदारांना फटका

द्राक्षमण्यांना तडे, भुरी रोगाची लागण

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

वाईन सिटी अशी जगभरात ख्याती असलेल्या नाशिक शहराला थंडीचा चांगलाच तडाखा बसला असून याचा परिणाम जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांना सोसावा लागत आहे. गुरुवारी (दि.२९ डिसेंबर) निफाडचा पारा ६.६ तर नाशिकचा पारा ८.७ वर पोहचल्याने जिल्ह्यातील नागरिकांसह शेतकऱ्यांना गारवा चांगलाच चटका देणारा ठरत आहे. वाढत्या थंडीचा विपरीत परिणाम जिल्ह्यातील द्राक्षबागांवर जाणवू लागला असून द्राक्षमण्यांना तडे जाणे, वाढ खुंटणे, द्राक्ष कुजणे, झाडांची मुळे चोक-अप होणे, द्राक्षघडात साखर उतरण्याची प्रक्रिया पूर्णतः थांबणे अश्या समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. थंडीपासून बागा वाचविण्यासाठी शेतकरी मध्यरात्री बागेत शेकोटी पेटवून उष्णता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच पहाटे उठून द्राक्षबागांना ठिबक पद्धतीने पाणी देत बागांना वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न करत आहेत.

जिल्ह्यात थंडीची लाट तीव्र स्वरूपाची असून, निफाड तालुक्यात सर्वात कमी तापमान आहे. येथील लहान मोठ्या गावांमध्ये नागरिकांना थंडीचा चांगलाच दणका बसला आहे. द्राक्षबागांचे सर्वाधिक क्षेत्र नाशिक, निफाड, चांदवड तालुक्यात असून वाढत्या थंडीमुळे या ठिकाणचे द्राक्ष उत्पादक शेतकरी भांबावले आहेत. तापमानाचा पारा दिवसेंदिवस खाली येत असल्याने थंडीची याठिकाणी प्रचंड वाढली आहे.  वाढत्या थंडीमुळे भुरी रोगाची लागण या बागांना लागत असून या द्राक्ष बागा संकटात सापडल्या आहे. त्यामुळे आपल्या बागा वाचविण्याची वेळ जिल्ह्यातील शेतकर्यांवर आली असून वाढत्या थंडीने त्यांची झोप उडवली आहे.

वाढत्या थंडीमुळे द्राक्ष उत्पादन प्रक्रिया थंडावली असून येत्या काळात देशात व परदेशात द्राक्ष निर्यात करताना कमी उत्पादनाचा फटका शेतकऱ्यांपासून आयात निर्यात करणाऱ्या व्यावसायिकांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून आपली द्राक्षबाग या बोचऱ्या थंडीपासून कशी वाचवता येईल यासाठी ते शर्थीने प्रयत्न करत आहेत. वाढत्या थंडीचा फटका द्राक्ष उत्पादन करताना होत असून, द्राक्षांना तडे पडणे, भुरी रोगाची लागण होणे आदी संकटांना तोंड द्यावे लागत आहे. रात्रभर जागून या बागांना शेकोटी देत उब देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे निफाड येथील द्राक्ष उत्पादक राहुल भोज यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 6:07 pm

Web Title: mercury drops in nashik grapes farmer faces problems
Next Stories
1 ‘लक्ष्मीदर्शना’चा सल्ला भोवला; रावसाहेब दानवेंविरोधात गुन्हा दाखल
2 मोहिते-पाटील शांतच
3 सूतगिरणीतून सूतजुळणी अधिक घट्ट!
Just Now!
X