प्रदीप नणंदकर, लातूर

‘आमच्याकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी आहे. उमेदवारीचे निकष ठरवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे व त्या यंत्रणेमार्फतच उमेदवार निश्चित केला जाईल. अनेकजण तोलामोलाचे असल्यामुळे उमेदवारी कोणाला दिली जाईल हे आताच सांगता येणार नाही, असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लातूर दौऱ्यात अलीकडेच केल्याने उमेदवारीवरून गोंधळ झाला आहे.  खासदार सुनील गायकवाड यांना उमेदवारी मिळणार की त्यांचा पत्ता कापला जाणार याचीच चर्चा सुरू झाली. दुसरीकडे, तीन राज्यांच्या निकालांमुळे काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

राहुल गांधींच्या आदेशाने कार्यकर्त्यांच्या मतदानातून उमेदवार निवडण्याचा देशातील काही मतदारसंघात प्रयोग करण्यात आला होता. त्यात लातूर मतदारसंघही होता.  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे या सेवानिवृत्त शिक्षकाला निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यापूर्वी कोल्हापूरचे जयवंत आवळे यांना निवडणुकीच्या िरगणात उभे करून त्यांना विजयी करण्याचे कसब लिलया विलासरावांनी दाखवून दिले होते. मात्र काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मोदी लाटेत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या लातूर शहर व ग्रामीण मतदासंघातही काँग्रेसच्या उमेदवारांना मताधिक्क्य टिकवता आले नाही.

लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपाला दमदार यश मिळत गेले. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, महापालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायत अशा प्रत्येक निवडणुकीत भाजपाने यश मिळविले. प्रत्येक निवडणुकीत मिळणाऱ्या यशामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास ढळत चालला होता तर भाजपचा वाढत होता.

दोन महिन्यापूर्वी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले तेव्हा ते तब्बल ५२ जणांनी उमेदवारी मागितली. मुंबई टिळकभवनात त्यांना मुलाखतीसाठी पाचारण करण्यात आले तेव्हाही ४८जण तेथे हजर होते. स्थानिक उमेदवारांनाच उमेदवारीत प्राधान्य द्यावे अशी मागणी करण्यासाठी स्थानिक उमेदवारांनी एकत्र येऊन मंचही स्थापन केला तर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघावर मतदारसंघाच्या बाहेरील मंडळींच्या नजरा असल्यामुळे अशा मंडळींनीही मुलाखती दिल्या आहेत.

भाजपचे खासदार डॉ. सुनील गायकवाड  पुन्हा उमेदवारी मिळेल या आशेवर असतानाच दानवे यांच्या विधानाने संशयाचे वातावरण निर्माण झाले. खासदार गायकवाड यांची संसदेतील हजेरी चांगली आहे. आपल्या कारकीर्दीत रेल्वेस्थानकाचा दर्जा वाढवला. विविध रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या. रेल्वेबोगी तयार करण्याच्या कारखान्याला मंजुरी मिळून कामाची सुरुवात झाली यासह अनेक कामे मार्गी लावल्याचा दावा गायकवाड करतात. भाजपकडे गायकवाड यांच्याशिवाय वडवळ येथील जिल्हा परिषद सदस्य व मोठे कंत्राटदार सुधाकर शृंगारे हे गेल्या दोन वर्षांपासून खासदारकीचे तिकीट मिळावे हे लक्षात घेऊन मतदारसंघात संपर्क करीत आहेत. जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती संजय दोरवे हेही उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत.

भाजपाच्या वतीने आत्मविश्वासपूर्वक आम्हीच निवडून येऊ असा दावा केला जात असला तरी भाजपांतर्गत गटबाजी उफाळून येत असल्याचे चित्र आहे. जुन्या-नव्याचा वाद, मुंडे, गडकरी गटापासून तयार झालेले अनेक गट संघटनात्मक स्थितीला धोक्याचा इशारा देत आहेत.