भारतीय परंपरेत रक्षाबंधन या सणाला खूप महत्त्व आहे. हे लक्षात घेऊन वाडय़ातील विवेकनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व क्वेस्ट संस्था यांनी शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम करत विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. येथील विद्यार्थ्यांनी कागदांपासून राखी बनवत आवारातील झाडांना वृक्षसंवर्धनाची राखी बांधली.
जिल्हा परिषदेच्या विवेकनगर शाळेत क्वेस्ट (क्वॉलिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट) या संस्थेचा शैक्षणिक उपक्रम सुरू आहे. शाळा व क्वेस्ट संस्था यांनी बुधवारी संयुक्तरीत्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम शाळेत राबवण्यात आला.
हा सण केवळ परंपरा म्हणून साजरा न करता सणांना निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करत विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाचे मूल्य रुजविण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी विद्यार्थ्यांनी कागद व अन्य साधनांच्या साहाय्याने राख्या बनवून शाळेच्या आवारातील झाडांना राख्या बांधल्या. या उपक्रमाने विद्यार्थ्यांनाही वेगळा आनंद मिळाला. हा उपक्रम राबविण्यासाठी मुख्याध्यापक वैभव व्यवहारे, शिक्षिका गीता चौधरी, क्वेस्टचे बालमित्र भूषण पटारे व चंद्रकांत लहांगे यांनी विशेष मेहनत घेतली.
आपल्या पारंपरिक सणांना निसर्गाशी जोडून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची मूल्ये रुजावीत यासाठी क्वेस्ट संस्थेच्या मदतीने रक्षाबंधनाचा उपक्रम राबवला. यात मुलांना खूप आनंद मिळाला.
– वैभव व्यवहारे, मुख्याध्यापक, जि. प. शाळा, विवेकनगर
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी क्वेस्ट संस्था काम करत असताना जीवनव्यवहाराशी शिक्षण जोडून विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजविण्याच्या दृष्टीने पर्यावरणस्नेही रक्षाबंधन साजरी करण्यासाठी हा उपक्रम राबवला.
– भूषण पटारे, बालमित्र, क्वेस्ट
First Published on August 15, 2019 12:21 am